कळंबोली वसाहतीला जोडून असणाऱ्या रोडपालीनोडमध्ये सिडकोने दोन महिन्यांपूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले. रोडपाली येथील सेक्टर १७ मध्ये सत्यम इप्रीयल इमारतीसमोर हा रस्ता खचला आहे. दोनच महिन्यांत येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सिडकोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये प्रसारमाध्यमांनी दुरवस्थेच्या समस्या मांडायच्या आणि सिडकोने त्यावर उपाय म्हणून त्या संबंधित समस्यांवर थातुरमातुर उपाययोजना करायची असे अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये भ्रष्टाचार कुठेतरी डोके वर काढतो आहे याचा संशय असल्याचे उत्तम उदाहरण सेक्टर ८ येथील हा रस्ता आहे. दोन महिन्यांपूर्वी काम करण्यात आलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने नागरिक व प्रसारमाध्यमांनी सिडकोच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त केल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) संजय भाटीया यांनी पुन्हा या रस्त्याचे काम करून घेतले. परंतु कामात झालेल्या निष्काळजीपणामुळे रोडपाली नोडमधील सेक्टर १७, २० येथील रस्ता खचल्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली.

टक्केवारीचा गौप्यस्फोट
सिडकोच्या एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सिडकोमधील अंतर्गत टक्केवारीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट केला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या मते कंत्राटदाराच्या नफ्याच्या हिशात सिडको अधिकाऱ्यांना टक्केवारी द्यावी लागते, त्याशिवाय या बिलांवर अधिकारी स्वाक्षऱ्या करत नाहीत. प्रत्येक टेबलवर अर्थाचे वजन ठेवल्याशिवाय येथे फाईल मंजूर होत नाही, त्यामुळे कामाचा दर्जा जपून काम करणे शक्य नसते. कंत्राटदाराच्या अजब खुलाशाने सिडकोचे एमडी भाटीया यांनी स्वच्छ कारभाराच्या उभ्या केलेल्या प्रतिमेला पुन्हा एकदा तडा जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सेक्टर १७ ते २० या रोडपाली नोडमधील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाच ते साडेपाच कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात आले आहे. रस्ता खचला नसेल पण समांतर पातळीमध्ये काही कमी-जास्तपणा आहे का ते पाहावे लागेल. संबंधित ठिकाणची पाहणी केल्यानंतर यावर भाष्य करता येईल.
 किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको