ठाणे येथील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह परिसरातील वर्षांनुवर्षे शरपंजरी पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पदपथांची डागडुजी आणि रंगरंगोटी आदी कामे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शहराच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळेच करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील तक्रारी सर्वसामान्य ठाणेकरांकडून करण्यात येतात. मात्र, त्यांना निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी तातडीने कामे व्हावीत, यासाठी महापालिका प्रशासनाने या सर्व कामांच्या निविदा मात्र काढल्या नव्हत्या, अशी माहितीही समोर आली आहे.
ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा २२ नोव्हेंबर रोजी नियोजित दौरा ठरविण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावरील रस्ते सुस्थितीत तसेच डांबरीकरणाद्वारे दुरुस्त करणे, पदपथ दुरुस्त करणे, साफसफाई तसेच रंगरंगोटी करणे, आदी कामे तातडीने करण्याचे आदेश महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या मार्गावरील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह परिसरातील नादुरुस्त रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. वर्षोनुवर्षे शरपंजरी पडलेला हा रस्ता मलवाहिन्या टाकण्यात आल्यामुळे खोदण्यात आला होता.
त्यामुळे त्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे १४ लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात आले असून त्यास मान्यता मिळावी, यासंबंधीचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या विषय पटलावर आणला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचा दौरा अल्प कालावधीत ठरल्यामुळे ही कामे विनानिविदा करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
शहरातील रस्तादुरुस्ती संबंधीच्या तक्रारींकडे महापालिका फारसे लक्षही देत नाही. त्याकडे साधे ढुंकूनही पाहात नाही, असा करदात्या ठाणेकरांचा आजवरचा अनुभव आहे. असे असतानाच मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणून शहरातील रस्ते चकाचक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात आणि त्यानुसार विनानिविदा कामेही पूर्ण करण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या या कारभाराविषयी ठाणेकरांकडून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.