शहरात विविध प्रकारच्या वाहिन्या टाकताना खोदण्यात आलेले रस्ते पुनस्र्थितीत करण्यासाठी देण्यात आलेल्या कामाची मुदत तीन वर्षांपूर्वी संपलेली असताना त्या कंत्राटदाराचे चांगभले करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या अभियंता विभागाने या कामाचे १०३ वेगवेगळी तुकडे करून पुन्हा कंत्राट देण्याचा पराक्रम केला आहे. यासाठी १५.९४ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला असून पालिकेचा लेखा विभाग, लेखापरीक्षण विभाग आणि दस्तुरखुद्द आयुक्तांनी डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नवी मुंबई पालिकेत बोगस कामांच्या बळावर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी चांगभले करून घेण्याचा सपाटा लावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर तर या कामांना अक्षरश: ऊत आला आहे. त्यातील अनेक सुरस कथा आता बाहेर येत असून विविध कामांसाठी रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदरांकडून पालिका शुल्क आकारत असते. त्यानंतर हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम पालिकेचे आहे. शहरात विविध ठिकाणी खोदण्यात आलेल्या अशा कामांची निविदा मे २०१२ रोजी संपली असताना त्यासाठी लागणारी स्थायी समितीची मंजुरी न घेता पालिकेच्या अभियंता विभागाने हे काम पुन्हा अजवाणी नावाच्या कंत्राटदाराला दिले आहे.
या कंत्राटदाराने नवी मुंबईतील रस्त्याची अनेक कामे केल्याने त्याच्यावर पालिका मेहेरबान आहे. त्याचप्रमाणे येथील बडय़ा राजकीय नेत्यांचा या कंत्राटदारावर नेहमीच वरदहस्त राहिला आहे. त्यामुळे स्थायी समितीची मंजुरी न घेता देण्यात आलेला पालिकेचा हा रस्ते खोदाई पुनर्बाधणी घोटाळा चांगलाच अडचणीत येणार असून त्याची माहितीच्या अधिकाराची कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. स्थायी समिती सभेच्या या कामाला मंजुरी घेण्यात आली नसली तरी ५ ते २५ लाख रुपये खर्चाची ही तब्बल १६ कोटी रुपयांची कामे स्थायी समितीच्या अवलोकनार्थ पाठविण्यात आली होती. तरीही या खर्चाचे हे काम देताना पालिकेच्या स्थायी समितीने चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. पालिकेत खोटी कामे दाखवून पैसे लुटण्याचे अनेक प्रकार सुरू असून या पालिकेची राज्य स्तरावरील चौकशी समितीकडून तपासणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.