शासकीय यंत्रणेच्या मर्यादा
अपघाताचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी समाज प्रबोधन म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनने रस्ता सुरक्षितता चळवळ राबविण्याची सूचना भारत संचार निगमच्या धुळे विभागाचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले. शासकीय यंत्रणा याबाबतीत कमी पडत असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.
रोटरीतर्फे वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणारे सभासद व दानशुर व्यक्तींचा सत्कार व पुरस्कार प्रदान सोहळा येथे झाला. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल अवतारसिंग पनफेर, अध्यक्ष प्रभाकर दवंडे, सचिव डॉ. मनिषा जगताप आदी उपस्थित होते. नितीन महाजन यांनी रोटरीने नेहमीच समाजातील गरजू लोकांसाठी आपत्ती तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत मोलाचे कार्य केले असल्याचे नमूद केले. आजची शिक्षण व्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा या सर्वसामान्यांसाठी कमी पडतात. किंबहुना त्या कुठेही प्रभावीपणे राबविल्या गेल्याचे जाणवत नाही. त्यावर उपाय म्हणून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, उपेक्षित, वंचित घटकांसाठी रोटरीच्या माध्यमातून असे काम होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. रोटरीने हे काम हाती घेतल्यास त्यांच्या नावलौकीकाला साजेसे भरीव कार्य होऊ शकते आणि त्यातून समाजाला मोठय़ा प्रमाणावर लाभ होऊ शकतो. यासाठी आर्थिक मदत करण्यास आपण तयार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
पाहुण्यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी डिस्ट्रीककडून नऊ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अध्यक्ष दवंडे आणि सचिव डॉ. जगताप यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. प्रास्तविकात दवंडे यांनी वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव डॉ. जगताप यांनी वर्षभरात झालेल्या प्रकल्पांची सचित्र माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय हरेश गुरनानी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. नितीन गडकरी व शिरीष भालेराव यांनी केले. आभार डॉ. चंद्रशेखर नामपुरकर यांनी मानले.