वाडीबंदरला पूर्व मुक्त मार्गाच्या उन्नत मार्गाचा चढ चढून गाडी वर आली की ऑरेंज गेट ते आणिक या ९.२९ किलोमीटर लांबीचा काळा कुळकुळीत आणि सपाट-गुळगुळीत असा डांबरी रस्ता सुरू होतो. त्याच्यावरून गाडी धावायला लागली की जणू विमानच रनवे वरून धावत आहे, असे वाटू लागते.. गाडी उन्नत मार्गावरून उतरते, काँक्रिटचा खडबडीत रस्ता सुरू होतो, आणि व आपले विमान ‘जमिनीवर’ येते.. पुढच्या काही मिनिटांत गाडी आणिक पांजरापोळ रस्त्यावरील बोगद्यात शिरते आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदेही फिके पडावेत अशी लखलखती दिव्यांची रोषणाई मनाला सुखावून टाकते. एरवी खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे कधी एकदा संपतो असा वाटणारा दक्षिण मुंबईपासून चेंबूपर्यंतचा प्रवास पूर्व मुक्त मार्गामुळे कधी संपतो हे कळतच नाही.
दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडणारा आणि ठाणे वा नवी मुंबईतून येजा करणाऱ्या वाहनांसाठी बांधण्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गाचा  वाडीबंदर ते चेंबूरच्या शिवाजी पुतळय़ापर्यंतचा साडे तेरा किलोमीटर लांबीचा पट्टा आता खुला झाला आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी मुंबईतील उड्डाणपुलांच्या बांधकामानंतर आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू खुला झाल्यानंतर, ‘रस्ता असावा तर असा’ हा अनुभव मुंबईकरांना आला. आता पूर्व मुक्त मार्गामुळे त्याच मालिकेत नव्हे राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाईल असा रस्ता मुंबईत बांधला गेला आहे.
वाडीबंदर ते आणिक हा ९.२९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा हा उन्नत मार्ग असल्याने तो डांबरी आहे. पण हे डांबरीकरण इतके व्यवस्थित आहे की उन्नत मार्गाच्या गर्डरमधील खाचांचे धक्केही जाणवत नाहीत. पण गाडी उन्नत मार्गावरून खाली उतरून ‘आणिक-पांजरापोळ रस्त्याला लागली की डांबरी रस्ता आणि काँक्रिटचा रस्ता यातील फरक लगेच जाणवायला लागतो. ‘मुंबईतील पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर डांबरी रस्ता लवकर खराब होतो. कितीही उत्तम केला तरी चार-पाच वर्षांत त्याची वार्षिक दुरुस्ती सुरू करावी लागते. याउलट काँक्रिटचा रस्ता १५ वर्षे बघावा लागत नाही. कसलाही देखभाल दुरुस्तीचा खर्च येणार नाही. त्यामुळेच हा टप्पा काँक्रिटचा केला आहे. तो थोडा खडबडीत असला तरी टिकाऊ आहे’, असे ‘एमएमआरडीए’चे मुख्य अभियंता शरद सबनीस यांचे म्हणणे आहे.  
या मार्गावरील ५०० मीटरचा बोगदा हा देशातील नागरी भागातील सर्वात मोठा असा रस्त्यावरील बोगदा आहे. या बोगद्यातील दिव्यांची रोषणाई  पाहताक्षणी मनात भरते. नेहमीसारखे ठिकठिकाणी दिवे लावण्यापेक्षा पांढरे-पिवळे दिवे ठराविक पद्धतीने लावल्याने बोगद्यातील रोषणाई पूर्व मुक्त मार्गावरील प्रवासाला चार ‘चाँद’ लावते.
पण पूर्व मुक्त मार्गावरील सुखद प्रवासाचे क्षण क्षणांत ओसरतात आणि वाडीबंदरच्या पुढे मुंबईकडे जाताना आणि सध्या चेंबूरच्या पुढे शिवाजी पुतळय़ानंतर मुंबईतील खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या कात्रीत आपण पुन्हा सापडतो. मुंबईतील प्रवास सुखाचा व्हायचा असेल तर पूर्व मुक्त मार्गासारख्या सोनेरी स्वप्नांबरोबरच गरज आहे ती खड्डेमुक्त रस्त्यांची. महानगरपालिकेला ते कधी जमेल कोणास ठाऊक?