परिवहन महामंडळाच्या बसच्या भाडय़ापेक्षा पथकर अधिक द्यावा लागत असल्याने प्रवाशांना विनाकारण आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. चंद्रपूर-नागपूर बस भाडे १३५ रुपये असतांना याच मार्गावरील पाच नाक्यावर प्रवाशांना १५० रुपये ‘पथकर’ भरावा लागत आहे. प्रवासापेक्षा पथकर अधिक द्यावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटल्या आहेत.
 चंद्रपूर-नागपूर हे अंतर १५५ किलोमीटर आहे. तीन ते साडेतीन तासाच्या या प्रवासासाठी परिवहन महामंडळाच्या बसची तिकीट १३५, तर खासगी ट्रॅव्हल्सची तिकीट १५० रुपये आहे, मात्र याच मार्गावर पाच पथकर नाके असून प्रवाशांना १५० रुपये पथकर द्यावा लागत आहे. महामंडळाच्या बसकडून प्रत्येक नाक्यावर पथकर आकारण्यात येत असल्याने नागपूर प्रवासासाठी दोन महिन्यापूर्वी १२५ रुपये भाडे आकारले जात होते. आज १३५ रुपये आकारण्यात येत आहेत. या मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे १३० ते १४० रुपये होते, परंतु बोरखेडीचा पथकर सुरू होताच दहा ते वीस रुपये भाडेवाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोलच्या भाववाढीने आधीच बस प्रवास महागलेला असतांना पथकर नाक्यांमुळे त्यात आणखी भर पडलेली आहे. चंद्रपूर-नागपूर या मार्गावर एकूण पाच पथकर नाके आहेत. चंद्रपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर ताडाळी या पहिल्या नाक्यावर चार चाकी वाहनांकडून २५ रुपये, वरोरा गावाजवळ नंदोरी पथकर नाक्यावर ३७ रुपये आणि त्यानंतर वरोरा व जाममधील दोन पथकर नाक्यांवर प्रत्येकी पाच रुपये, तर अवघ्या दोन महिन्यापूर्वी सुरू झालेल्या बोरखेडी पथनाक्यावर ७५ रुपये पथकर द्यावा लागत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पथकर द्यावा लागत असल्याने प्रवाशांनी आता ओरड सुरू केलेली आहे.  
 परिवहन महामंडळाच्या बस वगळता या मार्गावरून हजारो वाहने धावतात. त्यात ट्रक्स, हायवा, कार व इतर जड वाहनांचाही समावेश आहे. बोरखेडीच्या नाक्यावर कारकडून जेथे ७५ रुपये पथकर आकारला जात आहे तेथे जड वाहनांकडून ३५५ रुपये, सातपेक्षा अधिक चाके असलेल्या वाहनांकडून ४६० रुपये, बसकडून २३५ व मालवाहू वाहनांकडून ११५ रुपये पथकर आकारला जात आहे. बोरखेडीचा पथकर नाका पूर्वी डोंगरगाव येथे होता. आउटर रिंगरोडवरील या पथकर नाक्यावर शहरातील नागरिकांची अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असून ओरिएंटल प्रायव्हेट लि. या कंपनीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. बोरखेडी ते नागपूर हा पथकर फ्री रोड असतांना नागरिकांकडून वसुली केली जात आहे. टोल हा बुटीबोरीकडे जाणाऱ्या वाहनांकडून वसूल करायचा असतांना बुटीबोरीहून नागपूरकडे येणाऱ्या वाहनांकडूनही तो वसूल केला जात आहे. चंद्रपूरच्या प्रवाशाला १५५ किलोमीटरचा प्रवास करतांना १५० रुपये पथकर द्यावा लागत असल्याने या जिल्ह्य़ातील प्रवाशांवर हा अन्याय आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विनोद दत्तात्रेय, राजीव कक्कड यांनी हा प्रश्न लावून धरून पथकर प्रकरणी तक्रार केली आहे.    
पथकर चोरीसाठी शासनाच्या नावाचा उपयोग
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पथकर द्यावा लागत असल्याने बहुतांश कार चालकांनी पथकर चोरीसाठी स्वत:च्या वाहनांवर महाराष्ट्र शासन व प्रेस, अशी पाटी लावून घेतली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी शहरात अशा वाहनांची शोध मोहीम सुरू केली असतांना काल मंगळवारी एम.एच.३४-एम-९६३७ ही इंडिका कार जप्त केली. या कारवर महाराष्ट्र शासन, अशी पाटी लावण्यात आलेली होती. पथकर चोरीसाठी ही पाटी लावल्याची कबुली या कारचालकाने दिली, तर बहुतांश वाहनांवर ‘प्रेस’ अशी पाटी दिसते. पथकर चोरीसाठीच या पाटय़ा लावण्यात आल्याची माहिती सपकाळे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.