पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मागील शंभर दिवसांतील निर्णय हे धनदांडग्यांच्या हिताचे आहेत. यामुळे देश अधिक परावलंबी होण्याची भीती आहे. देशातील जनतेला रस्ते, पायवाटांची अधिक गरज आहे. बुलेट ट्रेन चालवून त्यात रोज बसणार कोण, असा प्रश्न करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी बुलेट ट्रेनपेक्षा सामान्य माणसाला गरजेच्या असलेल्या रस्ते-पायावाटा बांधा, असा सल्ला मोदी सरकारला दिला.
डोंबिवलीत एका कार्यक्रमात मेधा पाटकर ‘विकास योजना, आर्थिक विकास आणि पर्यावरण ऱ्हास’ विषयावर मेधा पाटकर बोलत होत्या. या वेळी डॉ. एम. आर. नायर, डॉ. आर. पी. बोंबरडेकर उपस्थित होते. विकासाच्या नावाखाली देशात उभारण्यात येणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे, अशी चिंता व्यक्त करताना ही हानी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पाटकर यांनी यावेळी केले. आदिवासींच्या जमिनी खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे नावावर करून त्यावर लवासा उभारणारे राष्ट्रवादी की राष्ट्रद्रोही याचा विचार जनतेने करावा. दिल्ली-मुंबई अतिजलद रेल्वे मार्गासाठी शेतक ऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत.
हा अन्याय व पर्यावरण संरक्षणाच्या लढय़ासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहिले पाहिजे, असे मेधा पाटकर यांनी स्पष्ट केले.