दिवसेंदिवस मंदावत चाललेल्या पदपथावरींल दिव्यांची तीव्रता आणि व्याप्तीचा आढावा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून रस्त्यांवरील दिव्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी आयआयटीवर सोपविण्यात येणार आहे.
मुंबईमधील दिव्यांची तीव्रता कमी होत असल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर महापालिकेत या विषयावर चर्चाही झाली. या संदर्भात धोरण आखण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला. आता मुंबईमधील रस्त्यांवरील दिव्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम आयआयटीवर सोपविण्यात येणार आहे. रस्त्यांची लांबी, रुंदी, दिव्यांची उंची, दिव्यांची तीव्रता या सर्व बाबींचा या सर्वेक्षणामध्ये अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, रिलायन्सने अंधेरीमध्ये केलेल्या पाहणीअंती तेथील दिव्यांची तीव्रता ५० टक्के कमी असल्याचे आढळून आले होते. आयआयटीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हाती येणाऱ्या अहवालाच्या आधारे पदपथावरील दिव्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी स्पष्ट केले.