लक्ष्मीनगर झोनमध्ये ऑरेज सिटी वॉटरतर्फे लावण्यात आलेले पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या कर विभागाचे सभापती गिरीश देशमुख यांनासुद्धा त्याचा फटका बसला असून त्यांच्या घरातून मीटर चोरीला गेले.  
झोनचे सभापती गोपाल बोहरे यांनी झोनमध्ये चौकशी केली. ही बाब गंभीर असून त्यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीनगर झोनमध्ये २४ बाय ७ ची कामे सुरू असलेल्या प्रतापनगर, अत्रे लेआऊट, तात्या टोपेनगर, गणेश कॉलनी, सुरेंद्र नगर, विवेकानंदनगर, एसई रेल्वे कॉलनी, पी अ‍ॅन्ड टी आदी भागामध्ये मीटर चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. चोरी गेलेल्या ठिकाणी नवे मीटर बसविण्यासाठी ओसीडब्ल्यूकडून १६०० रुपयांची मागणी केली जात आहे. गोपाल बोहरे यांनी या आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या झोनमधील नागरिकांनी झोन कार्यालयात मोर्चा नेला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ओसीडब्ल्यूने नवे मीटर लावण्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त केले असून  कंत्राटदारांनी कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला कामे दिली आहेत. त्यामुळे नेमके कोण काम करीत आहे, याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना नाही. ज्याच्याकडे मीटर लावण्याचे काम देण्यात आले होते त्यांनी मला काही माहिती नाही म्हणून हात झटकले. ज्या ठिकाणी मीटर लावले जातात त्याच्या भोवती लावण्यात पेटी हलक्या दर्जाची आहे त्यामुळे ती कोणीही काढून घेऊ जाऊ शकते. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोपाल बोहरे यांनी केली.