एक मिनिट अर्थात ६० सेकंद हा तसा अगदी कमी कालावधी. पण या एवढय़ाशा वेळातही खूप काही करता येतं! हे ६० सेकंद कुणाचं आयुष्यही बदलू शकतात. नेमका हाच वेळेचा फॉम्र्युला हाजिद अली मिर्झा बेग उर्फ अज्जू (४१) या ‘किमयागारा’ने आत्मसात केला. एका ‘गुरु’ने त्याला ६० सेकंदांची ‘कला’ शिकवली आणि मग सुरू झाली एकामागून एक घरे लुटण्याची साथ. ही कला होती अवघ्या ६० सेकंदांत कुलूप उघडण्याची. अज्जू ही कला शिकला साथीदारांच्या मदतीने आणि एक दोन नव्हे तब्बल २०० घरफोडय़ा करून त्याने प्रचंड माया जमवली.
हाजिद अली मिर्झा हा गोवंडीत राहणारा तरुण. गल्लीच्या नाक्यावर ‘कालापिला’ नावाचा फुटकळ जुगार चालवायचा. त्याची गाठ पडली अस्लम खान (नाव बदललेले) या ‘गुरु’शी. खानने त्याला श्रीमंत होण्याचा एक ‘मंत्र’ दिला. अवघ्या ६० सेकंदांत कुठलही कुलूप तोडण्याचं कसब त्याने हाजिदला शिकवलं. जर मिनिटभरात तू कुलूप तोडू शकलास तर तुला कुणी पकडू शकणार नाही आणि मग तू श्रीमंतीत लोळशील, असे खानने त्याला सांगितले.
अज्जूने ही कठीण कला शिकायचा निर्णय घेतला. खानने त्याला ही कला शिकवली. कितीही अत्याधुनिक कुलूप असले तरी कटावणी आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने उघडण्यात तो निपुण झाला.
६० सेकंदात कुलूप तोडू शकतो, ही कला जरी चांगली असली तरी त्यात पण आणखी थोडं वेगळंपण आणावं लागेल, असा ‘सल्ला’ही या अस्लमने अज्जूला दिला. त्यानुसार सुरक्षा रक्षक नसेल आणि सीसीटीव्हीही नसलेली इमारत निवडण्याचे कौशल्य त्याने दाखवले. त्या इमारतीत जाताना कुणी हटकू नये यासाठी तो महागडी गाडी वापरायचा. सुरुवातीच्या काही घरफोडय़ांमधून त्याला पैसा मिळाला होता. त्यातून त्याने ‘होंडा सिटी’ घेतली. सोबत चार साथीदार तयार केले. चोरलेला माल विकण्यासाठी एक सराफ आणि बहिणीला सोबत घेतले. अशाप्रकारे त्याची सातजणांची टोळी तयार झाली.
गाडीतून ते इमारतीत जायचे. दोघे खाली पहारा द्यायचे. सुरुवातीला ते इमारतीच्या वरच्या मजल्यावर जायचे. कुलूपबंद असलेले घर अज्जू एका मिनिटात उघडायचा. आत गेल्यावर जास्तीत जास्त पाच मिनिटांत ते लुटण्याचा कार्यभाग साधत. काही ठिकाणी दार बंद असले तरी घर बंद आहे की नाही त्याची कल्पना येत नाही. अशा वेळी दारावरची बेल वाजवायची आणि कुणी उघडले तर ‘शर्माजी है क्या’ अशासारखी चौकशी करून वेळ मारून न्यायची. कुणी दार उघडले नाही, तर ते बंद असल्याचे समजून तात्काळ अज्जू तोडून आत प्रवेश करायचा. लुटलेली किरकोळ अथवा मौल्यवान जी हाती लागेल ती वस्तू, रोख रक्कम साथीदारांना द्यायचा. उर्वरित दागिने सराफ विनोद सिंघवीला सांद्यायचा. सर्व दागिने जमवून नंतर स्वत:चा व्यावसाय उभा करायचा, अशी त्याची योजना होती. संघवी सराफाला तो या व्यवसायात २५ टक्के भागीदारी देणार होता.
गुन्हे शाखा १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी अज्जूच्या कारवायांची सविस्तर माहिती दिली. पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांत अज्जू आणि त्याच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. त्याच्या एकटय़ाच्या नावावर ९२ घरफोडय़ांचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या टोळीवर १२७ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो २००८मध्ये एकदाच पुण्यात पकडला गेला होता. नंतर सुटल्यावर तो मुंबईत सक्रीय झाला होता. मुंबईत घरफोडय़ा वाढल्याने पोलीस हैराण झाले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव आणि पोलीस अंमलदार सचिन सावंत यांनी मग माहिती मिळवून अज्जूला अटक केली. मग त्याच्या टोळीतील कैलाश मोरे, दीपक मिश्रा, संजय कामडी, अंजन मोहंती यांच्यासह सराफ विनोद संघवी आणि अज्जूची बहिण मेहरूनिस्सा सय्यद हिला अटक करण्यात आली. मुंबईत त्याने तब्बल २७ घरफोडय़ा केल्या होत्या. त्यातून त्याने जमवलेले ५४ लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याने गोवंडी, अंधेरी, मरोळ, साकीनाका येथे घरे तर नवी मुंबईच्या एका मॉलमध्ये दुकानही घेतले आहे. ‘६० सेकंदांचा’ त्याचा मंत्र भलताच यशस्वी ठरला होता. पण विध्वंसक वृत्तीचे पर्यवसान शेवटी नुकसानीतच होते तसेच अज्जूचेही झाले!