तालुक्यातील घोटी शहराची व्याप्ती वाढल्याने पोलीस बळ कमी पडू लागले असून चोरटय़ांना याचा फायदा होत आहे. शहरात घरफोडय़ा, जनावरांच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी  नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घोटीमध्ये काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे व्यापारी अधिक भयभीत झाले आहेत. शहराची वाढती व्याप्ती आणि पोलीसबळ लक्षात घेता चोऱ्या रोखण्यात आणि उपाययोजना करण्यास पोलीस असमर्थ ठरू लागले आहेत. परिणामी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी भरवस्तीतील युनियन बँकेसमोर उभे केलेले चारचाकी वाहन दुपारच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याबाबत मालुंजे येथील भाऊसाहेब झणकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, शहरातील वासुदेव चौक, भंडारदरा चौफुली येथे पोलिसांची कायमस्वरुपी नेमणूक करावी, शहरातील वाहतूक कोंडी दूर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.