इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) संरक्षण भिंतीला पडत असलेल्या छिद्रामुळे असमाजिक तत्त्वांचा वावर रुग्णालय परिसरात वाढला आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून प्रशासनही चिंतेत पडले आहे. हा प्रश्न कसा सोडवावा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.  
जवळपास ८० एकर परिसरात पसरलेल्या मेयो रुग्णालयाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत उभारली आहे. परंतु उत्तरेकडील भिंतीला नेहमीच छिद्रे पाडले जात आहेत. उपचारासाठी येणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने हे छिद्र पाडले जात असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गाने सामान्य नागरिकांसोबतच असामाजिक तत्त्वांची वर्दळही परिसरात वाढली आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. येथील प्रशिक्षणार्थी व निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात तर नेहमीच चोऱ्या होतात. येथील विद्यार्थी प्रशासनाकडे तक्रारी करतात. यावेळी गोलमाल उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे तात्पुरते समाधान केले जाते. एवढेच नव्हे तर चोरांची एवढी हिंमत वाढली की वार्डात शिरून लोखंडी व अन्य वस्तूंची चोरी करू लागले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे साहित्यही चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. चार वर्षांपूर्वी नेत्र विभागातील एका अटेंडन्सला चाकूचा धाक दाखवून तिच्याजवळील स्ट्रेचर सुद्धा चोरून नेले होते. गेल्या दहा वषार्ंपासून हा चोरीचा प्रकार येथे सुरू आहे. आपल्याला किती दिवस राहायचे, म्हणून विद्यार्थी व डॉक्टर तक्रार करत नाहीत. तर रुग्णांच्या तक्रारीवरही काही कारवाई होत नाही. प्रशासनही आपल्या मागे उगीच डोकेदुखी लावून घेण्यास तयार नाही. या वृत्तीमुळे चोरांचे फावत आहेत.
या चोऱ्यांवर कायमचा उपाय म्हणून संरक्षण भिंतीला पडलेले छिद्र बुजवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात आल्यानंतर मेयोच्या प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे छिद्र बुजवण्याचे काम सुरू केले. गेल्या दहा वर्षांपासून संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी पडलेले छिद्र बुजवण्याचे काम सुरू आहेत. छिद्र बुजवले की लगेच दुसरीकडे दुसरे छिद्र पाडले जाते. डागडुजीवर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. त्यामुळे मेयो प्रशासनासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्रासून गेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे चोरीचे सत्र काही थांबत नाही. येथे येणारे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक काही दिवसांचेच पाहुणे असतात, त्यामुळे ते सुद्धा या प्रकरणाकडे फारसे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. पण, हा प्रकार किती दिवस चालणार. सामान्य रुग्णांच्या सुरक्षतेसाठी कुणीतरी पुढाकार घेणे आवश्य आहे.