टिटवाळ्यात गेल्या पाच दिवसांपासून चोरटय़ांनी बंगले, इमारती, गाळ्यांमध्ये घुसून लाखो रुपयांचे सोने, रोख रक्कम लुटून नेली आहे. ४ जानेवारीपासून सलग पाच दिवस या चोरीच्या घटना रात्री, दिवसा घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका पोलिसाच्या घरातच चोरी करून चोरटय़ांनी आपली हिम्मत दाखवून दिली आहे.
गायत्रीधाम सोसायटीतील गाळ्यांचे शटर तोडून चोरटय़ांनी रोख रक्कम लुटून नेली. येथील एका दूध डेअरीतील सुट्टे पैसे चोरटय़ांच्या नजरेतून सुटले नाहीत. गणेशनगर सोसायटीतील पारसनाथ तिवारी यांच्या शाळेतून शालेय साहित्याची चोरी करण्यात आली आहे. याच भागात राहणारे मराठी सिनेअभिनेते दीपक सावंत यांच्या बंगल्यातून चोरटय़ांनी ८६ हजारांची रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर चोरटय़ांनी पोलीस सुरेश शिंदे यांच्या घरात चोरी करून ५० ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरून नेला. नेहा कदम या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भुरटय़ांनी हिसकावून पलायन केले, अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे. या सर्व घटनांमुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे चोरटे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणारेच असल्याने ते अचूकपणे चोऱ्या करीत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले.