लग्न ही खर्चिक बाब. कितीही साधेपणाने लग्न केलं तरी काही किमान पैसा लागतोच. मग पैशांची जुळवाजुळव करता करता नाकी नऊ येतात. एका तरुणाने स्वत:च्या लग्नाच्या पैशांसाठी चक्क वाहन चोरीचा प्रताप केला.
वडाळ्यात राहणारा संदीप सकट (२८) हा तरूण दादर येथील एका डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून कामाला होता. गेल्या चार पाच वर्षांपासून तो त्यांच्याकडे काम करत असल्याने त्याने विश्वास संपादन केला होता. संदीप जळगाव जिल्ह्यातील होता. तेथे त्याचे लग्न ठरले होते. पण लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. २२ जून रोजी त्याने डॉक्टरांची गाडी चोरून फरार झाला. माटुंगा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, सोमवारी कुल्र्याच्या सीएसटी रोड येथे एक इसम चोरीची गाडी विकायला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ५ चे पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी सापळा लावून संदीपला अटक केली.  लग्नाच्या पैशांसाठी भंगारात ही गाडी विकणार असल्याची माहिती संदीपने दिली. विशेष म्हणजे मंगळवारीच त्याचे लग्न होणार होते. लग्नाची तयारी सुरू असताना संदीप आता माटुंगा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.