उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे दैवत मानले जात असलेल्या तालुक्यातील कोटमगाव देवस्थानातून मंगळवारी सहा किलो चांदीच्या छत्रीसह सुमारे चार लाख ५० हजार रूपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचा संगम असलेले हे देवस्थान नाशिक-येवला रस्त्यालगत आहे. पहाटेच्या सुमारास गाभाऱ्यात प्रवेश करून चोरटय़ाने दोन लहान व एक मोठी याप्रमाणे सहा किलोच्या तीन छत्र्या आणि गाभाऱ्यापुढील दोन दान पेटीतील सुमारे एक लाख रूपयांची रोकड लंपास केली. चोरीच्या अवघे दीड तास आधी शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने मंदिराची तपासणी केली होती. मंदिरासाठी एक सुरक्षा रक्षकही आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात साधारण ३० वर्षांची रंगाने सावळी व्यक्ती दिसते. हिरवा शर्ट, त्यावर पांढरे उभे पट्टे, काळी पँट, तोंडावर  गुलाबी स्कार्फ असा त्याचा पेहराव असून हातात लोखंडी खिळा दिसतो. या युवकाने चोरी केली असून सीसीटीव्हीतील हालचालींवरून कमीतकमी दोन चोर असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरटय़ांनी प्रारंभी दक्षिणेकडील खिडकीचे ग्रिल करवतीने तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. आठपैकी सात सीसीटीव्हींमध्ये त्याचे चित्रीकरण झाले आहे. सकाळी ३.२५ ते ४.२५ दरम्यान ही चोरी झाली आहे. चोरी झाल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब कोटमे यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी श्वान पथक आणले. परंतु कोटमगावच्या बंधाऱ्यापर्यंतच त्याने मार्ग दाखवला. येवल्यातही पहाटेच्या सुमारास दोन ते तीन दुकानांचे छत फोडून किरकोळ चोरी झाली. नवरात्रोत्सवात येथे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. देवस्थानाचे महत्व लक्षात घेऊन धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास करण्यात येत असून सात कोटी ९३ लाख रुपयांची विकास कामे सुरू आहेत.