रिक्षाने निघालेल्या महिलेस गुंगीच्या औषधाचा वास देऊन तिचे ११ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला, तर एका व्यावसायिकाला शरणपूर रस्त्यावर मारहाण करून त्याच्याकडील एक लाख १० हजार रुपयांची रक्कम तीन युवकांनी लंपास केली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षातील प्रवाशांना लुटण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता दिवसाही असे प्रकार घडू लागल्याचे या घटनेने दर्शविले आहे. कृष्णाबाई शिंदे (७०) या सिडकोच्या उपेंद्रनगर भागातून गुरुवारी शालिमारला जाण्यास निघाल्या होत्या. रिक्षात दोन व्यक्ती आधीपासून बसल्या होत्या. रस्त्यातच कोणी तरी त्यांना गुंगीच्या औषधाचा वास दिला. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली असता त्यांच्याकडील दागिने लंपास करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांना पंचवटीतील सीतागुंफा परिसरात सोडून देण्यात आले. शुद्धीवर आल्यावर ही बाब लक्षात आली. रिक्षा चालकाच्या मदतीने संशयितांनी हा प्रकार केल्याची तक्रार शिंदे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे लूटमारीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास शरणपूर रस्त्यावर मनोज चोरडिया या पेट्रोल पंपचालकास लुटण्यात आले. पेट्रोल पंपाहून घरी परतत असताना चोरडिया यांना तीन युवकांनी अडविले. मारहाण करीत त्यांच्याकडील एक लाख १० हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.