चांदवड तालुक्यातील पिंपळणारे शिवारात एका शेतकऱ्याच्या घरावर पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकून महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेले. पलायन करणाऱ्या दरोडेखोरांचा परिसरातील ग्रामस्थांनी पाठलाग करून एकाला पकडले. अन्य चार जण कारमधून पळून गेले. पकडलेला संशयित मुंबई येथील असून अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवड तालुक्यातील पिंपळणारे शिवारात विश्वनाथ दत्तात्रय चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर कुटुंबिय झोपी गेले. सर्व सदस्य गाठ झोपेत असताना मध्यरात्री दरोडेखोरांनी दरवाजाची आतील कडी उघडून घरात प्रवेश केला. खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशातील रोकड त्यांनी आधी काढून घेतली. मग दरोडेखोरांचा मोर्चा महिला वर्गाकडे वळाला. झोपेत असणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने ओढण्यास त्यांनी सुरुवात केली. यामुळे एकच आरडाओरड झाल्यावर आसपासचे शेतकरी जागे झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराबाहेर पळ काढला. आसपासच्या ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी एकाला पकडण्यात यश आले. उर्वरित चार जण कारमधून पसार झाले. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती वडनेर भैरव पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी सर्वत्र सतर्कतेचा इशारा देऊन संशयित कार धुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास यश आले नाही. ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयिताचे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयिताचे नाव विनोद जयस्वाल असून तो मुंबईच्या सायन भागातील रहिवासी आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या टोळीकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

दोन गटांत हाणामारीनंतर गोळीबार
प्रतिनिधी, नाशिक
शहरातील वाढती गुन्हेगारी थांबण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नसून नाशिकरोड परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर चक्क गोळीबाराचा प्रकार घडला आहे.
शहर आणि परिसरात लूटमार, घरफोडी असे प्रकार वाढतच आहेत. असाच एक प्रकार नाशिकरोड परिसरात सोमवारी घडला. एकलहरा रस्त्यावरील इरफान ख्वाजा महंमद शेख (३५) यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दोन दिवसांपूर्वी गोदरेजवाडीत राहणारे संशयित प्रशांत मोहिते, सागर कांबळे यांच्यासह तिघांनी शेख यांच्या घराजवळ येऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यात शेख हे जखमी झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर प्रकाश कांबळे यांनी दुसरी फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार सिन्नरफाटा परिसरातील बाजारपेठेजवळ सोमवारी रात्री संशयित इरफान शेख यासह बाबा शेख, जाफर शेख, फिरोज शेख, अस्पाक शेख, अस्लम शेख हे कांबळे यांच्याकडे आले. आपल्या भावास मारहाण का केली, या कारणावरून कुरापत काढून शेख व त्यांच्या साथीदारांनी प्रकाश कांबळे व त्यांचा मुलगा सागर यांना मारहाण केली. या दरम्यान कांबळे पिता-पुत्रांनी आरडाओरड केल्याने संशयित गोळीबार करून पसार झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.