दिवाळीच्या काळात शहरातील बहुतांश रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरल्याने चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. दीपावलीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची घरे लक्ष्य करत, वाहनतळातील गाडय़ा तसेच सार्वजनिक ठिकाणी चोरटय़ांनी आपली हातसफाई सुरू ठेवली आहे. आठवडाभरात शहर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये १० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेला. अंधारामुळे चोरटय़ांना चांगलेच फावल्याचे लक्षात येते.
लक्ष्मी पूजनानिमित्त पंचवटी येथील जाजूवाडी परिसरात कलानगर सोसायटीत राहणाऱ्या रायते कुटुंबीयांनी आपले दागिने, काही रोख रक्कम बँकेतून काढून आणली होती. विधिवत पूजन झाल्यानंतर सणासुदीचे दिवस म्हणून त्यांनी दागिने व रक्कम घरात ठेवली. काही कामानिमित्त रायते कुटुंबीय बाहेर गेले. या वेळी चोरटय़ांनी बंद दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडत देव्हाऱ्यासमोरील कपडय़ाच्या पिशवीत ठेवलेले दागिने लंपास केले. त्यात सहा तोळे वजनाच्या पाटल्या, बांगडय़ा, राणी हार, दहा ग्रॅमच्या अंगठय़ा, कानातील जोड व काही रोख रक्कम असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी सुनंदा रायते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत कॅनडा कॉर्नर परिसरातील गुरुकृपा अपार्टमेंटमधून चारचाकी वाहनातून किमती साहित्य चोरटय़ांनी गायब केले. अभिजीत कोठुळे यांनी आपली चारचाकी मोटार इमारतीच्या खाली उभी केली होती. रात्री उशिराने अज्ञात इसमाने चारचाकी वाहनाच्या पुढील बाजूची काच कटरच्या साहाय्याने कापत आतमधील टेप, जेडीएल कंपनीचा हुपर, रेबॅन कंपनीचा गॉगल असा १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसरी घटना जेलरोड येथील जामा मशीद येथे घडली. मुनीर जिलानी शेख (३०) हे मशीद स्वच्छ करण्यासाठी आले होते. त्यांनी आपला अंगरखा काढून ठेवला. काम करत असताना वडाळागाव येथील शमशुद्दीन शेख याने त्यांचे पाकीट लंपास केले. काम आटोपल्यानंतर शेख यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आसपास चौकशी केली असता शमशुद्दीन गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याआधी इंदिरानगर परिसरात एकाच वेळी दहा घरे फोडण्याची करामत चोरटय़ांनी केली होती. कामटवाडा परिसरातही लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेली रोख रक्कम व दागिने चोरटय़ांनी लंपास केले. शहरातील अनेक भागांत पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.