शहरात वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेतर्फे सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे. मात्र या सप्ताहातच तोंडाला स्कार्फ लावून विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरच प्रीती तायडे या महिलेची पर्स लुटल्याची घटना घडली. सुरक्षा सप्ताहावेळीच ही  घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर ऑटोमधून जात असलेल्या महिलेची पर्स दोन चोरटय़ांनी हिसकावून पळवून नेली. ही घटना सांयकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
 जिल्हा सामान्य रुग्णासमोरून प्रीती तायडे ही महिला ऑटोने तुकूमकडे जात होती.
ऑटो सिध्दार्थ हॉटेलजवळ येताच दोन चोरटे विना नंबर प्लेटच्या दुचाकीने आले आणि त्यांनी ऑटोतील तायडे यांची पर्स हिसकावून पळवली. त्यात सात हजार रुपये किंमतीचा गोफ, दोन हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण नऊ हजार रुपयांचा ऐवज आणि काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच ड्रायव्हींग लायसेन्स होते. दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या चोरटय़ाने तोंडाला स्कार्फ बांधला होता.
या ऑटोमागून दुचाकीने येत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑटोमधील महिलेची पर्स पळवून नेत आहे, असे दिसताच त्यांनी त्या चोरटय़ांचा पाठलाग करीत त्यांना वरोरा नाका चौका पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चोरटे आंबेडकर महाविद्यालयाच्या दिशेने पसार झाले. त्या विद्यार्थ्यांनी याची माहिती वरोरानाका चौकातील ट्राफीक पोलिसांना दिली. यावरून वाहतुक पोलीस नियंत्रक शाखेच्या कार्यालयात ऑटो जमा करण्यात आला व त्या अज्ञात चोरटय़ांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्याला डी. बी. मडावी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. सोमवारला ज्या ठिकाणी पर्स पळवल्याची घटना घडली त्याच्या बाजूला पोलीस मुख्यालय, वाहतूक नियंत्रक शाखेचे कार्यालय व जवळच रामनगर पोलीस ठाणे आहे. अशा घटना पोलिसांच्या राहत्या हद्दीतच घडत असतील तर दुसऱ्या ठिकाणांचे काय? यामुळे शहरातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे.