श्रीगोंदे शहरात आज मध्यरात्री पुन्हा एकदा दरोडा पडला. दरोडेखोरांनी तब्बल सुमारे ६ लाख ७० हजार रूपयांचा ऐवज लांबवला. शहरातील प्रसिध्द वकील श्रीनिवास पत्की यांच्या घरी ही चोरी झाली. प्रत्यक्षात रक्कम यापेक्षा जास्त आहे, मात्र पोलिसांनी ती कमी दाखवल्याचे बोलले जाते.
आज मध्यरात्री शहरातील भरवस्तीमध्ये कुभांर गल्ली येथे राहणारे पतकी यांच्या घरावर दरोडा पडला. ते काल (रविवार) परगावी गेले होते. दरोडेखोरांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दीड लाखांची रोख रक्कम व ५ लाख २० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने असा ६ लाख ७० हजारांचा ऐवज लांबवला. सकाळी सात वाजता पतकी गावावरून आले असता त्यांना दरवाजाचा काडी-कोयंडा तोडल्याचे दिसले, त्यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलीस निरीक्षक अजय जाधवराव घटनास्थळी आले.
शहरात व तालुक्यात दरोडे व चोऱ्यांची मालिका सुरूच आहे, त्याला आवर घालण्यात पोलिसांना साफ अपयश आले आहे. या सततच्या घटनांनी नागरीकांत आता घबराट व्यक्त होत असुन पालकमंत्री बबनराव पाचपुते मात्र मौन बाळगुन असल्याची भावना लोकांमध्ये व्यक्त होते.