07 August 2020

News Flash

रविवार पेठेत चोरटय़ांनी सहा दुकाने फोडली

शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत बुधवारी पहाटे सहा ते आठ घाऊक किराणा दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम आणि सुकामेवा लंपास करण्याच्या मालिकेमुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली

| July 17, 2014 09:02 am

ट्रकमधून लाखोंचा माल पळविला ’सीसी टीव्हीमध्ये चोरटे कैद
शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत बुधवारी पहाटे सहा ते आठ घाऊक किराणा दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम आणि सुकामेवा लंपास करण्याच्या मालिकेमुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, चोरटय़ांनी किराणा दुकानातील माल पळवून नेण्यासाठी थेट मालमोटार आणली. चोरटय़ांच्या या करामतीचे चित्रण सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असल्याने त्यांना लवकर पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला. या स्वरूपाचा प्रकार नगर येथेही घडला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाल्याची प्रतिक्रिया धान्य घाऊक व्यापारी संघटनेने व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांत चोरी, घरफोडी, सोनसाखळी खेचून नेणे असे प्रकार वाढत असताना आता चोरटय़ांची हिंमत थेट गजबजलेल्या भागातील दुकाने फोडण्यापर्यंत पोहोचल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेल या पद्धतीने चोरटय़ांनी दुकाने फोडून मालमोटारीद्वारे माल पळून नेण्याचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी दिसते. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालमोटार घेऊन सात ते आठ चोरटे रविवार पेठेतील तेली गल्लीत दाखल झाले. रविवार कारंजापासून समीप असणारा हा परिसर व्यापारी पेठेचा असला तरी वाडे व इमारतींमध्ये राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चोरटय़ांनी एखाद्या दुकानात माल आल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी दगडूभाऊ तेली चांदवडकर या आयुर्वेदिक औषधे व किराणा मालाच्या दुकानाचे शटर तोडले. दुकानातील कप्प्यांची छाननी करून रोकड सापडते काय, याची छाननी केली. फारसे काही हाती न लागल्याने चोरटय़ांनी या दुकानात तोडफोड केली. चोरटय़ांची ही सर्व करामत सीसी टीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.
यानंतर चोरटय़ांनी महेंद्र पटेल यांचे शिवम ट्रेडर्स, रमेश पटेल यांचे महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, मोहनलाल रामजी समस यांचे होलसेल किराणा दुकान, घनकर गल्लीतील मेसर्स अग्रवाल सेल्स एजन्सी, हिरालाल गल्लीतील अमित कासलीवाल यांच्या अमित ट्रेडिंग या दुकानांकडे मोर्चा वळवून शटर उचकवीत जे हाती लागेल ते गायब करण्याचा प्रयत्न केला. अग्रवाल एजन्सीतून ७० हजाराची रोकड, महालक्ष्मी ट्रेिडग दुकानातून आठ हजाराची रोख रक्कम, सात किलो काजू व तीन किलो वेलदोडे, सनस याच्या किराणा दुकानातून तीन हजारांची रोकड लंपास केली. वेगवेगळ्या दुकानांमधून लुटलेला माल चोरटे मालमोटारीत भरत होते. ही बाब एका दूधवाल्याच्या लक्षात आल्यावर त्याने एका व्यापाऱ्यास कळविली.  दरम्यानच्या काळात चोरटे मालमोटार घेऊन पसार झाले. काही वेळात परिसरातील व्यापारी घटनास्थळी दाखल होऊ लागले. पोलिसांनी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. काही दुकानांच्या बाहेर सीसी टीव्ही असल्याने चोरटय़ांनी कशा पद्धतीने हालचाली केल्या त्याचे सर्व चित्रण उपलब्ध झाले आहे. काही चोरटे दुकान फोडत असताना एक संशयित बाहेरील स्थितीवर नजर ठेवून होता. या घटनेने व्यापारी वर्गही धास्तावला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसी टीव्ही चित्रण पाहिले. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आ. नितीन भोसले, भाजपचे माजी शहराध्यक्ष विजय साने यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापारीवर्गाशी चर्चा केली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्यावरून चोरटय़ांना लवकर पकडण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सीसी टीव्ही कॅमेरे उभारून सुरक्षारक्षकही नेमणार
अतिशय मध्यवस्तीत चोरटय़ांनी दुकाने लुटण्याचा केलेला प्रयत्न जागरूक नागरिकाच्या दक्षतेमुळे थोडक्यात निभावला. पण, ही सर्व व्यापाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असून धान्य किराणा घाऊक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यासोबत एका व्यापारी संकुलात सामूहिकपणे सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी सूचना नाशिक जिल्हा धान्य घाऊक व्यापारी संघटनेमार्फत सदस्यांना केली जाणार आहे. याशिवाय, रविवार कारंजा परिसरात पोलीस चौकी उभारणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कामकाज बोहोरपट्टीतील इमारतीतून चालायचे. यामुळे चोरटय़ांना पोलिसांचा धाक होता. पण, नंतर हे पोलीस ठाणे-गंगापूर रस्त्यावर नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. यामुळे रविवार कारंजा परिसरात कायमस्वरूपी पोलिसांचे वास्तव्य असावे म्हणून चौकी उभारावी, अशी संघटनेची मागणी आहे. मालमोटारीतून दुकाने लुटण्याचा प्रकार नगरमध्ये झाला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाली.
– प्रफुल्ल संचेती
(अध्यक्ष, नाशिक जिल्हा धान्य घाऊक व्यापारी संघटना)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2014 9:02 am

Web Title: robbery in six shops near raviwar peth in nashik
टॅग Nashik,Robbery
Next Stories
1 शासकीय अनास्था चिंतेचा विषय
2 सिंहस्थाच्या नियोजनात पोलीस गुंग, तर चोरटय़ांची आधीच ‘पर्वणी’
3 अन्नदानामुळे गंगाघाटास बकाल स्वरूप
Just Now!
X