तलवारीचा धाक दाखवीत काठीने मारहाण करून सुमारे साडेदहा तोळे दागिन्यांची लूट दरोडेखोरांनी केली. निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला.
विंचूर येथील आकाशनगर येथे लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचा बंगला आहे. रविवारी रात्री ते पत्नी, वडील व मुलगा यांच्यासमवेत झोपलेले असताना रात्री अडीचच्या सुमारास चार दरोडेखोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. सर्वप्रथम दरोडेखोरांनी लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या पत्नीस तलवारीचा धाक दाखवीत सोने देण्याची मागणी केली.
दागिने न दिल्यास मारण्याचा दम दिला. दरोडेखोरांनी लक्ष्मीकांत यांचे वडील यशवंत कुलकर्णी यांच्या कपाळावर काठीने जोरदार प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे भयभीत झालेल्या कुलकर्णी कुटुंबीयांनी त्यांना घरातील साडेदहा तोळे सोने व चांदीचे साहित्य काढून दिले. घरातील चार मोबाइलही दरोडेखोर घेऊन गेले. चारही दरोडेखोर अंदाजे पंचवीस वर्षे वयाचे होते. ते मराठी भाषेत बोलत होते. दोघांनी तोंड कपडय़ाने बांधले होते तर दोघांचे चेहरे उघडे होते. त्यांच्याकडे तीन तलवारी असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. दरोडेखोर पळाल्यानंतर घाबरलेले हे कुटुंब घराबाहेर आले. त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने विंचूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
लासलगावचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक शीतल पाटील, निफाडचे पोलीस निरीक्षक बी. टी. बारवकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले यशवंत कुलकर्णी यांच्यावर निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे हलविण्यात आले आहे.