शीळ डायघर येथील उत्तरशीव भागात बुधवारी पहाटे आठ दरोडेखोरांनी एका गोदामातील दोन कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून तांब्याची तार आणि मोबाइल, असा सुमारे एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
उत्तरशीव परिसरात मुसाफिर यादव यांचे गोदाम असून त्यामध्ये तांब्याची तार ठेवण्यात येते. या गोदामाच्या संरक्षणाचे काम सुरक्षारक्षक दशरथनाथ राम (६०) करतात. तसेच गोदामामध्ये काम करणारे गोविंद कुमार हे तिथेच राहतात. बुधवारी रात्री सुरक्षारक्षक दशरथ हे गोदामाबाहेरील खुर्चीत बसले होते तर गोविंद कुमार गोदामातील पोटमाळ्यावर झोपले होते. तसेच गोदामाच्या शटरला बाहेरून कुलूप लावण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास आठ दरोडेखोर तिथे आले आणि त्यांनी दशरथला धमकावून शटर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर चार दरोडेखोर आतमध्ये शिरले तर चौघे गोदामाबाहेरच थांबले. आतमध्ये शिरलेल्या दरोडेखोरांनी दशरथ आणि गोविंद कुमार या दोघांचे हातपाय लुंगी आणि कपडय़ाने बांधून गोदामातील तांब्याची तार आणि मोबाइल, असा एक लाख ९१ हजारांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.