15 August 2020

News Flash

लग्नमंडपात ‘बिनबुलाये मेहमान’

विवाह सोहळ्यात फुकट मिळालेल्या मिष्टान्नावर भरपेट ताव मारून झाल्यानंतर विवाह मंडपातील वधुवरांच्या खोलीतील चार लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगरात नुकतीच घडली.

| January 28, 2015 09:33 am

विवाह सोहळ्यात फुकट मिळालेल्या मिष्टान्नावर भरपेट ताव मारून झाल्यानंतर विवाह मंडपातील वधुवरांच्या खोलीतील चार लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगरात नुकतीच घडली. विशेष म्हणजे दागिने चोरताना कुणाला संशय येऊ नये, म्हणून टोळीतील लोकांनी लहान मुलांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांत मोठय़ा विवाह सोहळ्यात प्रवेश करून चोरी करणारी नवी टोळी सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ठाणे शहरातील रामदेव रेसिडेन्सीमध्ये ओमप्रकाश भाटिया राहत असून त्यांचा मुलगा जितेंद्र (३०) याचे लग्न २१ जानेवारीला झाले. उल्हासनगरातील मयूर हॉटेलमध्ये लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान चोरटय़ांनी चार लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले. त्यात लग्न सोहळ्याला दहा वर्षांची मुलगी आणि एक तरुण आले होते. लग्न समारंभात गुंतलेल्या नातेवाइकांचे लक्ष नसल्याचे पाहून मुलीने चार लाखांच्या दागिन्यांची पिशवी चोरली. मग, ती मुलगी आणि युवक एकामागोमाग हॉटेलमधून बाहेर पडले, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी या दोघांविषयी वधू आणि वराच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता हा सगळा लवाजमा दोन्ही बाजूंच्या परिचयाचा नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील घटनेशी साधम्र्य..
काही महिन्यांपूवी मुंबईतील लग्न समारंभात दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोऱ्या लहान मुलीने केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उल्हासनगरात झालेल्या चोरीच्या घटनेत अशी कार्यपद्धती चोरटय़ांनी अवलंबल्याचे दिसून येते. मुंबई आणि उल्हासनगरातील चोरीच्या घटनांमध्ये काहीसे साधम्र्य आहे. यामुळे उल्हासनगरमधील घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आता मुंबईतील घटनेत सक्रिय असलेल्या टोळ्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या तपासातून टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी काही धागेदोरे लागतात का, याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एम. जाधव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 9:33 am

Web Title: robbery in wedding ceremony
टॅग Robbery,Thane
Next Stories
1 भिवंडीत आज पाणी नाही
2 उद्यानात थंडाई
3 शिधावाटप दुकानदारांचा रविवारपासून बेमुदत बंद
Just Now!
X