इचलकरंजीतील प्रसिध्द सूत व्यापारी अरुणकुमार गोयंका यांच्या मध्यवर्ती ठिकाणच्या कार्यालयात जबरी चोरीचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. चोरटय़ांनी सुरक्षा रक्षकाचे हात-पाय बांधून कार्यालयातील कॅश बॉक्स फोडून ३ लाख लंपास केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच शिवाजीनगर पोलिसांनी चोरटय़ांना अटक केली. तुषार कांबळे व सुरेश नाडे अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत.    
शाहू कॉर्नर परिसरात सूत व्यापारी गोयंका यांचे विष्णू चेंबर्स नावाचे टोलेजंग कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री ते बंद झाल्यावर रात्रपाळीस असणारा सुरक्षारक्षक तुषार कांबळे याला कार्यालयात तोडफोडीचा आवाज आला. तेथे जाऊन तो पाहात असताना दोघा अज्ञातांनी लाकडी ओंडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. तो बेशुध्द पडल्यावर चोरटय़ांनी मागील बाजूस असलेल्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला. सीसी कॅमेरे व पिना काढून टाकल्या. आतील कॅश बॉक्समधील तीन लाख रुपये लंपास केले.     
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी गोयंका व तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. कार्यालयातील दिवाणजी तुलशीराम पारेख यांनी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरीच्या परिस्थितीचे निरीक्षण करून व सुरक्षारक्षकाचे संशयीत लक्षण लक्षात घेऊन तपास केला. घरभेद्याकडूनच हा प्रकार घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, सहायक पोलीस निरीक्षक ढगे यांनी सुरक्षारक्षक तुषार कांबळे (वय २१ रा. हिंगणगाव, ता. हातकणंगले) व त्याचा गावातील मित्र सुरेश नाडे (वय २०) यांना अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरी केलेले २ लाख ८८ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.