महाराजबागजवळील पत्रकार सहनिवासातील तीन फ्लॅट चोरटय़ांनी फोडून सोने-चांदीच्या दागिन्यासह लाखो रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटना प्रकाश देशमुख, प्रदीप मैत्र आणि डॉ. आर. नांदेकर यांच्या फ्लॅटमध्ये घडल्या. पत्रकार सहनिवास क्र. १ मधील इमारतीतील ब्लॉक क्र. बी-१/९ मध्ये प्रकाश देशमुख (६२) राहतात. ते पत्नीसह पुणे येथे मुलांकडे गेले आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आलमारीत ठेवलेले २८ तोळे सोने व ५० हजार रुपये चोरून नेले. एकूण ८ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. कपाटातील सर्व कपडे व इतर वस्तूही चोरांनी अस्ताव्यस्त फेकून दिल्या. देशमुख यांच्या फ्लॅटला लागूनच प्रदीप मैत्र यांचा फ्लॅट आहे. चोरांनी या फ्लॅटचे कुलूप तोडले, परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मैत्र यांनी हा फ्लॅट त्यांनी खरेदी केला असला तरी ते तेथे राहात नव्हते, त्यामुळे हा फ्लॅट रिकामाच होता. ते दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहतात. चोरांनी गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅटमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
यानंतर चोरांनी पत्रकार सहनिवासच्या क्र. २च्या इमारतीतील डॉ. आर. नांदेकर यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच आलमारीत ठेवलेला ऐवज चोरून नेला. परंतु नांदेकर यांच्या फ्लॅटमधून किती किंमतीचा ऐवज चोरून नेला हे मात्र कळू शकले नाही. डॉ. नांदेकर यांचे नरखेड येथे खासगी रुग्णालय असून ते तेथेच राहतात. याच इमारतीत परमात्मा स्ट्रक्चर लि.कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीतर्फे शेती, फ्लॅट, प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जातो. या कंपनीचे संचालक जयदेव धांडे आहेत. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी अर्चना वाघ सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आल्या असता, त्यांना कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. तसेच कार्यालयातील कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी लगेच ही माहिती कार्यालयाचे संचालक जयदेव धांडे यांना दिली. चोरी झाल्याची माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस घटनास्थळी आले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून चोरांचा शोध घेतला जात आहे.