५० लाखांची रोकड एका बँकेतून सहा किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाखेत न्यावयाची जोखीम. चारचाकी वाहन नाही की सुरक्षारक्षक नाही. इतकी मोठी रक्कम नेण्यासाठी वाहतूक खर्चापोटी मिळणारी रक्कम आहे किमान १३५ ते अधिकतम १५० रुपये. या रकमेत चारचाकी वाहन मिळणे तर अवघडच. यामुळे घासाघीस करून रिक्षाचा पर्याय निवडणे भाग पडले. या प्रकारे नेली जाणारी ५० लाखांची रोकड सहजपणे लंपास होण्यामागे बँकेचा निष्काळजीपणा हे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. इतक्या मोठय़ा रकमेची वाहतूक करताना बँकेने पोलीस यंत्रणेला सूचित करण्याचे औदार्य दाखविले नाही.
मंगळवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची ५० लाखांची रोकड डोळ्यात मिरचीची पूड फेकून लंपास करण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती तक्रारदारांकडून घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा आश्चर्यचकित झाली आहे. वास्तविक, मोठी रक्कम हाताळताना, वाहतूक करताना सुरक्षारक्षकांची नियुक्ती व सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना याआधीच वारंवार केली गेली आहे. इतकेच नव्हे तर, जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली गेली. असे असूनही उपरोक्त घटनेत सर्व पातळीवर निष्काळजीपणा घडल्याचे निदर्शनास येते. तक्रारदारांनी कथन केलेल्या घटनाक्रमानुसार बँक व्यवस्थापक रामदास महाले आणि शिपाई लहानु भारती हे येवला शहरातून ही रोकड घेऊन अंदरसुलला निघाले होते. रोकड वाहतुकीसाठी संबंधितांना बँकेकडून १३५ रुपये भत्ता दिला जातो. या रकमेत चारचाकी वाहन मिळणे अशक्यच. यामुळे काही रिक्षाचालकांशी त्यांनी चर्चा केली. मग, एक रिक्षा निश्चित करून रोकड घेऊन ते निघाले होते. रस्त्यात मोटारसायकलवर आलेल्या चोरटय़ांनी प्रथम रिक्षाचालकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा लगतच्या खड्डय़ात गेली. एका चोरटय़ाने व्यवस्थापक व शिपायाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. परंतु, उभयतांना चष्मे असल्याने त्यांच्या डोळ्यात तिखट गेले नाही. उलट पूड फेकणाऱ्याची काठी त्यांनी ओढून घेतली. पण, प्रतिकार केला नाही. या गोंधळात चोरटय़ाने रोकड असणारे पोते घेऊन पलायन केले.
रिक्षा शोधण्यासाठी व्यवस्थापक व कर्मचारी तासभर शहरात फिरत होते. यावेळी कोणी त्यांच्यावर पाळत ठेवली याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. स्थानिक पातळीवर या स्वरूपाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची धरपकड करून चौकशी केली जात आहे. मोठय़ा रकमेची वाहतूक करताना बँकेने चारचाकी वाहनाची उपलब्धता करणे आवश्यक होते. त्यासाठी बँक केवळ १३५ रुपये ते १५० रुपये वाहतूक भत्ता देत असल्याने रिक्षा अथवा दुचाकीशिवाय रोकड नेण्याशिवाय कर्मचाऱ्यांजवळ कोणताही पर्याय नसतो. या घटनेत स्वस्तातील पर्याय रोकड सहजपणे पळवून नेण्यास कारक ठरला. वास्तविक, कोणत्याही बँकेने स्थानिक पोलीस ठाण्याला पूर्वकल्पना दिल्यास रोकड वाहतूक करताना सशस्त्र बंदोबस्त देता येईल. मात्र, बँका तशी मागणी करण्याबाबत उदासीन असल्याचे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणेने वारंवार बैठकांद्वारे बँकांना सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही.
या संदर्भात एनडीसीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रोकड नेण्यासाठी मिळणारा भत्ता किमान २०० रुपये असल्याचे सांगितले. आवश्यकता भासल्यास चारचाकी वाहनांसाठी लागणारी रक्कमही दिली जाते. तथापि, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, वाहतूक भत्ता वाढवून मिळावा आणि सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव बँकेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, येवल्यातील लूट प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. बँकेशी संबंधित कोणी व्यक्तीकडून चोरटय़ांना टीप दिली गेली काय, याची छाननी केली जात आहे. ज्या रिक्षातून रोकड वाहतूक झाली, तिची नोंदणी झालेली नाही. १७ वर्षांच्या अल्पवयीन चालकाकडून ती चालवली जात होती. मोठी रक्कम एक हजार ते ५०० रुपयांच्या नोटांमध्ये हाताळणे आवश्यक ठरते. मात्र, या घटनेत १०० रुपयांच्या नोटा अधिक होत्या. यामुळे पोते सहजपणे कोणाच्या दृष्टिपथास पडू शकत होते. असे वेगवेगळे पदर धाडसी लुटीच्या प्रकरणात पुढे आल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण भागातील हजारो एटीएमही ‘रामभरोसे’
५० लाखाची रोकड लंपास झाल्यानंतरही ग्रामीण भागात अनेक सहकारी, खासगी, राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम यंत्र रामभरोसे असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. एटीएममध्ये मोठय़ा प्रमाणात रोकड असते. या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षकांची नियुक्त करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. शेकडो बँकांची ग्रामीण भागात हजारोंच्या संख्येने एटीएम सेंटर्स असतील. पण, बहुतांश ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाय योजना केली गेलेली नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.