जानेफळ येथील भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम अज्ञात चोरटय़ांनी फ ोडून ४ लाख ७० हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केली. सोमवारी रात्री ही घटना घडली. या धाडसी चोरीमुळे जानेफळ व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मेहकर तालुक्यातील जानेफळ बसथांब्यावर असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेची एटीएम मशिन चोरटय़ांनी अतिशय चातुर्याने फ ोडली. ज्या ठिकाणी रोकड ठेवली जाते तोच विशिष्ट भाग चोरटय़ांनी पध्दतशीरपणे काढला व या रकमेची चोरी केली. त्यानंतर चोरटय़ांनी पलायन केले. स्टेट बॅंकेच्या जानेफळ येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅंकेच्या एटीएम मशिनमध्ये ५ जानेवारी शनिवारला १० लाख रुपये ठेवले होते. काही खातेदारांनी पैसे काढल्यानंतर सोमवारी रात्री मशिनमध्ये ४ लाख ७० हजार ९०० रुपये शिल्लक होते. मशिनमधील ही रक्क म लंपास करण्यात चोरटय़ांना यश मिळाले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आर.टी.वाघ व पोलीस ताफयाने घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर बुलढाण्यावरून वरुण राजा या श्वानपथकासह फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण क रण्यात आले. श्वानपथकाने चोरटय़ांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आले नाही. स्टेट बॅंकेचे एटीएम बसस्थानकावर आहे. तेथून पोलीस ठाणे देखील जवळच आहे. असे असतांना ही धाडसी चोरी झाली. बॅंकेच्या एटीएमजवळ सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. एटीएमचे सीसीटिव्ही कॅमेरे सुरू होते किंवा नाही, याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य त्या तपासाचे ठाणेदार वाघ यांना निर्देश दिले.