शिर्डीत घरफोडी
शिर्डी येथील पानमळा परिसरात अगदी रस्त्यालगत भरदुपारी घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी ८५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. शिर्डीतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरीकांबरोबरच भाविकांनीही संताप व्यक्त केला आहे.
शिर्डीचे उपनगनर असलेल्या पानमळा भागात नांदूर्खी रस्त्यालगत नगरसेवक उत्तम कोते यांच्या घरासमोरच बाळासाहेब भाऊराव देशमुख यांचे घर असून त्यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पत्नीसमवेत आज ते बाहेरगावी गेले होते, तर मुलगा अक्षय कॉलेजला गेला होता. तो दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी आला असता त्याला घराचे दार उघडे असल्याचे व दारात एक अनोळखी तरुण दाराला ब्ल्यूटूथ लावून फोनवर बोलत असल्याचे दिसले. अक्षय गाडी लावत असतानाच या तरुणाने हातातील पिशवी तेथेच टाकून पळ काढला. त्याचा दुसरा साथीदार रस्त्यावर मोटार सायकलवर बसलेला होता. यामुळे संशय आल्याने अक्षयने तातडीने घरात जावून पाहिले तर कपाट उघडून उचकापाचक केल्याचे आढळले. तो तसाच धावत बाहेर आला. मात्र तोपर्यंत चोरटा आपल्या साथीदारासह पळून गेला होता. या चोरटय़ाने टाकलेल्या पिशवीत बेंटेक्सचे काही दागिने व छन्नी,
हातोडा आढळून आला. देशमुख
यांच्या कपाटातील लॉकर उघडून ८० हजार रुपयांचे सोने व ५ हजारांची रोकड पळविल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत शिर्डी पोलिसात बाळासाहेब देशमुख यांनी फिर्याद दाखल केली. या चोरटय़ांचे वय २५ ते ३० च्या दरम्यान असून, ते हिंदूीत बोलत असल्याचे अक्षय देशमुख याने सांगितले. शिर्डीत महिलांच्या गळ्यातील दागिने धूमस्टाईलने लांबविण्याच्या घटनामध्येही दिवसेंदिवस वाढ होत
असून, या टोळीचा बंदोबस्त करण्यास शिर्डी पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. शिर्डीतील पाकिटमारी दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या
गुन्हेगारीचा नायनाट करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. वाढत्या गुन्हेगारीबरोबरच अवैध प्रवासी वहातूक, अवैध धंदे मोठय़ा प्रमाणात बोकाळले आहेत.