करमाळा-नगर रस्त्यावर जातेगाव शिवारात चार-पाच दरोडेखोरांनी मारुती मोटार अडवून त्यातील सर्व प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मनगटी घडय़ाळ, मोबाइल संच असा सुमारे एक लाख ३७ हजारांचा ऐवज लुटून नेला. करमाळा पोलीस ठाण्यात या दरोडय़ाची नोंद झाली आहे.
नीलेश त्रिंबक पिंपळे (वय २८, रा. येवला, जि. नाशिक) यांनी या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपळे कुटुंबीय पहाटेच्या वेळी करमाळामार्गे नाशिककडे निघाले होते. करमाळ्याच्या पुढे जातेगाव शिवारात त्यांची मारुती मोटार आली असताना अचानकपणेचार-पाच दरोडेखोरांनी सदर मोटार अडविली. नंतर दरोडेखोरांनी दहशत निर्माण करून पिंपळे यांच्याकडून मोटारीची चावी काढून घेत त्यांच्या आई, मामा, आजी, भाऊ आदी सर्वाना चाकूचा धाक दाखवत त्यांना लुटले. यात १८ हजारांची रोकड, सोने-चांदीचे दागिने, दोन मोबाइल संच, मनगटी घडय़ाळ असा एकूण एक लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे हे या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.