आर्णी येथील ठाणेदार गिरीश बोबडे यांचे नुकतेच अमरावती जिल्ह्य़ात स्थानांतर झाले असून त्यांच्या जागी नव्याने ठाणेदार सर्जेराव गायकवाड रुजू झाले आहे. गायकवाड रुजू होताच चोरटय़ांनी त्यांना सलामी दिली असून येथील संजय भास्करराव गंडमवार हे आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असताना चोरटय़ांनी त्यांच्या घरात शिरून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  
चोरटय़ांनी बंद घरांना फोडून मोहीम सुरू केल्याचे चित्र  बऱ्याच दिवसांपासून सुरू  आहे. ५ जूनला झालेल्या या चोरीचा सुगावा अद्याप पोलिसाना लागलेला नाही. प्रथम संजय गडमवार यांनी १ लाख ६० हजाराची चोरी झाल्याचे पोलिसांना तक्रारीतून स्पष्ट केले होते. नंतर त्यांनी घरातील चौकशी केली असता सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे आभूषण चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांनी पुन्हा आर्णी पोलिसांना घटनेची माहिती दिली. १ जूनपासून मित्राच्या लग्नात गेलेल्या संजय गडमवार यांच्याकडील चोरीमुळे आर्णीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांनी चौकशी सुरू केली असून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. मात्र, अद्याप चोरटे पोलिसांच्या जाळ्यात आलेले नाही.  दरोडय़ाचीही चौकशी सुरू आहे. या दरोडय़ात दरोडेखोरांचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. या दरोडेखोरांनी सहा जणांना जखमी केले होते. त्याचप्रमाणे पूर्ण शहरातून एकच मेनरोड असल्याने व याच रस्त्यावर शाळा असल्याने वाढणारी वाहतूक दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या बाबीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते. अवैध धंदे वाढणार नाही व चोरटय़ांना आळा बसेल, या दृष्टीने ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांच्यासमोर एक मोठे आव्हान असून ते हे कशा पद्धतीने हाताळतात, याबाबत चर्चा होत आहे.