शहरातील दक्षिण कसब्यात पारिजात अपार्टमेंटमध्ये विक्रीकर अधिकाऱ्याची बंद सदनिका फोडून चोरटय़ांनी २७ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे एक किलो चांदीच्या वस्तू, मोटारसायकल असा मिळून सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक ऐवज लंपास केला. पोलिसांनी मात्र या चोरीची किंमत सात लाख ८० हजारांएवढी नमूद केली आहे.
विक्रीकर उपायुक्त लहुजी गुरव हे आपल्या कुटुंबीयांसह परगावी गेले होते. दोन दिवसांनंतर ते परत आले असता आपली सदनिका चोरटय़ांनी फोडल्याचे दिसून आले. बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी १० तोळे सोन्याच्या पाटल्या, पाच तोळ्यांच्या बिलवर, सात तोळ्यांचे तोडे, चार तोळे पोहेहार व १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व कर्णफुले असे एकूण २७ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच चांदीचे ताट, निरंजन, करंडा, लक्ष्मीच्या तीन मूर्ती, नाणी असा सुमारे एक किलो चांदीचा ऐवज तसेच टायटन घडय़ाळ चोरटय़ांनी चोरून नेले. चोरटय़ांनी जाताना सदनिकेच्या खाली उभी केलेली गुरव यांची नवीन मोटारसायकलही लंपास केली. गुरव यांच्या पत्नी भाग्यश्री गुरव यांनी यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलीस निरीक्षक एम. आर.खाडे हे पुढील तपास करीत आहेत.
सोनसाखळी लंपास
शहराजवळील बाळे येथे सुरू असलेल्या खंडोबा यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या संगीता सतीश देवदास (वय ४०, रा. गोदूताई परूळेकर विडी घरकूल वसाहत, कुंभारी) यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी चोरटय़ांनी लांबविली. या गुन्ह्य़ाची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.