कुरिअरची जमा झालेली सुमारे बारा लाखांची रोकड मोटारसायकलवरून घेऊन जाणाऱ्या दोघा तरूणांना अज्ञात चौघा चोरटय़ांनी अडवून त्यांच्याकडून मोटारसायकलसह संपूर्ण रोकड बळजबरीने घेऊन पोबारा केला.  दयानंद महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रात्री साठेआठच्या सुमारास ही घटना घडली.
यासंदर्भात जयेशकुमार मंगलभाई ओझा (वय २३, रा. वर्धमान हाईट, रुपाभवानी मंदिर रोड, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार या गुन्ह्य़ाची माहिती अशी की, जयेशभाई ओझा हे मे. गणेश प्रकाशकुमार कांितलाल (अहमदाबाद) या कुरिअर कंपनीसाठी काम करतात. रात्री हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डात व्यापाऱ्यांकडून कुरिअरसाठी जमा झालेली ११ लाख ७८ हजार ५२० रुपयांची रोकड एका बॅगेत घालून जयेशकुमार ओझा हे आपले सहकारी विपूल जयंतीभाई सतवारा (वय २८, मूळ रा.गुजरात, सध्या सोलापूर) यांच्यासह अॅक्टिव्हा मोटारसायकलवरून मालकाच्या कार्यालयाकडे निघाले होते. परंतु वाटेत दयानंद महाविद्यालयाजवळ अज्ञात चार तरूणांनी ओझा यांचा पाठलाग करून त्यांची मोटारसायकल अडविली व धक्का देऊन खाली पाडली. नंतर ओझा व त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली. चोरटय़ांनी पिशवीसह मोटारसायकल घेऊन काही क्षणातच पलायन केले. जोडभावी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के हे या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.