सेलू येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटीवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सोने व १६ लाखांची रोकड पळविल्याच्या घटनेचा बनाव संस्थेतील कर्मचाऱ्यांनीच केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या खोलीतून ८५ तोळे सोने जप्त करून व्यवस्थापकासह सहाजणांना ताब्यात घेतले.
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सेलू येथे जवाहर रस्त्यावरील भारत संकुलात श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी, अहमदनगरच्या सेलू शाखेत दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १६ लाख रुपये व सोन्याचे दागिने पळविले, अशी घटना घडल्याची फिर्याद शाखा व्यवस्थापक मारुती पवार याने दिली. त्यावरून सेलू पोलिसात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी सी. आर. रोडे, निरीक्षक लक्ष्मीकांत शिनगारे, बाबुराव राठोड, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी माधव लोकुलवार, संजय वळसे, सुरेश टाकरस, प्रकाश बोके, अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पतसंस्थेत पाहणी केल्यानंतर या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा हात असू शकतो, असा संशय बळावल्याने पोलिसांनी व्यवस्थापक मारुती पवार, रोखपाल जयदीप खरात, लिपीक संदीप जाधव, कुलदीप उंडे यांना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी प्रियंका िशदे व पहारेकरी पठाण यांनाही ताब्यात घेतले.
बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग देवकर, संचालक अंबर काळे, कायदा सल्लागार अॅड. नितीन भालेराव रात्रीच सेलूत पोहोचले. शनिवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी व्यवस्थापक राहत असलेल्या खोलीची तपासणी केली. या वेळी खोलीतील अडगळीच्या सामानाच्या ठिकाणी पोलिसांना सोन्याची ८४३ ग्रॅम वजनाची १३ पाकिटे व बिअरच्या रिकाम्या ६ बाटल्या आढळून आल्या. शनिवारी सायंकाळपर्यंत पतसंस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी चालू होती. उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.
पोलिसांच्या ताब्यात असलेला व्यवस्थापक पवार याने सेलू शाखेतील कर्मचारी मनोज घुमरे याचा या घटनेशी संबंध असू शकतो, असा जवाब पोलिसांकडे दिला. त्यामुळे घुमरेचा जवाब नोंदवला, तेव्हा रोखपाल खरात व इतरांनी ‘आयपीएल’मध्ये सट्टाबाजी केली होती. त्यामुळे खरातवर दोन-अडीच लाखांचे कर्ज झाल्याची माहिती समोर आली. मात्र, व्यवस्थापकाच्या खोलीत ८५ तोळे सोने सापडल्यामुळे पतसंस्थेत पडलेला दरोडा हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.