जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील त्र्यंबक रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रेत्यांनी अनधिकृतपणे गाळे उभारणी सुरू केली असताना आणि त्यास पोलीस यंत्रणेने आक्षेप घेतला असताना या विषयात मौन बाळगणाऱ्या महापौरांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुरुवारी या विषयावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, शासकीय रुग्णालय व पोलीस अधिकाऱ्यांची बंद दाराआड बैठक झाली. ध्वनिप्रदूषण होणार नसल्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याची तयारी रुग्णालयाने दर्शविली. हा धागा पकडून महापौरांनी पोलिसांनीही तसा दाखला द्यावा, असे प्रयत्न केले. पोलीस यंत्रणेने मात्र ही मागणी धुडकावली आहे. या एकूणच घडामोडींमुळे मूर्ती गाळ्यांच्या विषयात महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांची भूमिका परस्परविरोधी ठरली आहे. गतवर्षी अखेपर्यंत असाच घोळ घातला गेला होता. पालिकेने वरकरणी विरोध दर्शवून त्र्यंबक रस्त्यावर विक्रेत्यांना गाळे उभारण्याची अप्रत्यक्षपणे परवानगी दिली गेली. यंदाही त्यापेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे आवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता क्षेत्र असताना त्या ठिकाणी महापालिकेने केवळ आर्थिक स्वार्थासाठी गाळ्यांना जागा देऊ नये, अशा आशयाचे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे. प्रारंभी जिल्हा रुग्णालयाने त्र्यंबक रस्त्यावरील गाळ्यांना आक्षेप घेऊन त्याचा जाच रुग्ण, त्यांचे नातेवाईक व नागरिकांना सहन करावा लागतो असे सांगितले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून जलतरण तलावाच्या बाजूने दुतर्फा विक्रेत्यांचे गाळे लागतात. यामुळे गणेश चतुर्थीच्या कित्येक दिवस आधीपासूनच या भागात गजबजाट होण्यास सुरुवात होते. वाहतूक कोंडी व ध्वनिप्रदूषण या समस्यांना सामोरे जावे लागू नये, तसेच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे यासाठी पोलीस यंत्रणेने आधीच पत्र पाठवून अवगत केले आहे.
दरम्यानच्या काळात महापौरांनी अनधिकृतपणे गाळे उभारणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असे म्हटले होते. तसेच विक्रेत्यांना याच रस्त्यावरील इदगाह मैदानावर गाळे उभारण्याची परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या घडामोडी सुरू असताना गुरुवारी महापौर अ‍ॅड. वाघ यांनी जिल्हा रुग्णालय व पोलीस यंत्रणेसोबत या मुद्दय़ावर पुन्हा बैठक बोलाविली.
बंद दाराआड झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही महापौरांनी दिली नाही. तथापि, बैठकीस उपस्थित असणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयास ना हरकत दाखला देण्यासाठी राजी करण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषण होणार नसल्यास तसे पत्र देण्यास काही हरकत नसल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा धागा पकडून महापौरांनी पोलीस यंत्रणेने रस्त्यावरील गाळे उभारणीला आक्षेप घेऊ नये असे प्रयत्न केले. रुग्णालयाप्रमाणे पोलीस यंत्रणेने पत्र द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. परंतु शांतता क्षेत्रात गाळे उभारणीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा विरोध कायम आहे.
मागील सात ते आठ दिवसांपासून गाजत असलेल्या या विषयावर तोडगा काढण्यात महापालिका अपयशी ठरली. मुळात पालिकेला तोडगा काढायचा आहे की नाही याबद्दल संभ्रम आहे. एकीकडे अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांवर कारवाईचे सुतोवाच करताना दुसरीकडे कारवाई करण्याऐवजी इतर यंत्रणांनी आक्षेप घेऊ नयेत, असे प्रयत्न केले जात आहेत.