जिल्हाधिकारीपदाची सूत्रे रुबल अग्रवाल यांनी आज, रविवारी सुटीच्या दिवशी तातडीने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून स्वीकारली. या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक व जिल्हय़ातील विविध विकासाची कामे आपण सर्वाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला.
सुटीच्या दिवशी रुजू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सकाळी धावपळ उडाली. अग्रवाल यांची शुक्रवारी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या शनिवारी व रविवारी सुटी असल्याने सोमवारी सूत्रे स्वीकारणार होत्या. मात्र शनिवारी सायंकाळी त्यांना अद्याप सूत्रे का स्वीकारली नाहीत, सूत्रे स्वीकारून अहवाल सादर करा, अशी सूचना मिळाल्याने त्यांनी लगेच रविवारी सकाळी सूत्रे घेतली. पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण दिले गेलेले नाही, तसेच ते रजेवर गेल्यानेही अग्रवाल तातडीने सुटीच्या दिवशी रुजू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मात्र जिल्हय़ात सध्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी, बँकांचा संप यामुळे अग्रवाल तातडीने हजर झाल्याचे कारण अधिकारी पुढे करत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल व शर्मिला भोसले, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, नगरचे तहसीलदार राजेंद्र थोटे, विजय ढगे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. वसंत गारुडकर आदी उपस्थित होते.
अग्रवाल नगर जिल्हा परिषदेच्याच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. गेल्या सोमवारी या पदावर ठाण्याहून शैलेश नवाल यांची नियुक्ती झाली. नवाल गेल्या बुधवारी रुजू झाले.