जिल्हा परिषद, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व महापालिकेतील विविध विभागात प्रशिक्षण देणारी मिटकॉन कंपनी बनावट असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे, असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज मिटकॉनला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळून कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मिटकॉन कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. या अनुषंगाने क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिटकॉन कंपनीत अनेक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी असून ही कंपनी सरकारशी संबंधित आहे, असे दाखविले जाते. या कंपनीमार्फत वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणे दिली जातात. मानव विकास मिशन, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याणच्या योजनांबाबतची प्रशिक्षणे देणाऱ्या या संस्थेला ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आलेली आहे. ही संस्था बनावट असल्याने ती बंद करावी, यासाठी रिपाइंच्या मनोज भालेराव, अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. तसेच कार्यालयासमोर निदर्शने केली. कार्यालयास टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. मिटकॉन कंपनीचे संचालक अभय कुलकर्णी हे पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याने भ्रष्टाचार दडपून टाकण्यासाठी आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ९ जणांना अटक केली.