बौद्ध समाजाची होत असलेली उपेक्षा, वाढते अत्याचार व दलित, मागास आणि अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन-प्रशासनाची उदासीनता बघता आगामी लोकसभा आणि त्यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी स्वाभिमानाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मॉरिस महाविद्यालयाच्या प्रांगणात भीमसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रा. कवाडे बोलत होते. कार्यक्रमाला गोपाळराव आटोटे, अ‍ॅड. जे.के नारायणे, ताराचंद्र खांडेकर, इ.मो. नारनवरे, मिलिंद सुर्वे, थॉमस कांबळे, जयदीप कवाडे, पी.के. गजभिये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात बौद्ध गया महाबोधी महाविहारात झालेले साखळी बॉम्बस्फोट, महाबोधी विहाराचा ताबा बौद्ध भिक्खू संघाला देण्याबाबत सरकारने दाखविलेली अनास्था, बौद्ध समाजाची होत असलेली उपेक्षा, दलितांवर होणारे अत्याचार इत्यादी घटनामुळे शासन दलित विरोधी आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दलित मागास अल्पसंख्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. रिपब्लिकन नेत्यांनी कुणाचेही लांगुलचालन न करता विखुरलेली जनशक्ती एकवटून रिपब्लिकन चळवळीच्या स्वाभिमानी अस्तित्वासाठी एकत्र येण्याची गरज आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या पहिल्या फळीमुळे दुसरी फळी विभागाली असून कार्यकर्ते द्विधा मनसस्थितीत आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांवर दलितांचा विश्वास नाही. समाजात केवळ मतांसाठी उपयोग केला जात असल्यामुळे त्यांचे लांगुलचालन बंद करून सर्व रिपब्लिकन नेत्यांनी  एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे कवाडे म्हणाले.