रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (खोब्रागडे) कामगार दिनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह इतर समस्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकार कोणाचेही असो गेल्या ११७ वर्षांपासून विदर्भाच्या मागणीकडे पाठ फिरवली जाते. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे लाल झाला आहे. राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अद्यापपर्यंत त्यांना मिळालेली नाही. निसर्गाच्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तेव्हा राज्य व केंद्र सरकारने वेगळा विदर्भ देऊन संपन्न असलेल्या राज्याला व जनतेला स्वतंत्रपणे कामे करण्याची संधी द्यावी, असे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.
तसेच विदर्भातील म्हाडा कॉलनी गोधनी रेल्वेच्या ३२६ गाळेधारकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळण्याबाबत ३ लाख ४० हजार रुपये पाच वर्षांंच्या पूर्वी देऊनही व या मागणीकरता गेल्यावर्षी दोन महिने सतत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार खैरकर व गोधनी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी लेखी हमी देऊनही अद्यापपर्यंत टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही. फक्त विहिरीचे अशुद्ध पाणी मिळते. त्यामुळे स्थानिक नागरिक १० मेपासून आंदोलन करणार आहेत. तेव्हा खोटे आश्वासन देणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
गोदावरीनगरातील झोपडपट्टीत फिरोज बानो या महिलेवर अन्याय करणाऱ्या व त्यांच्याकडून १५ हजार रुपये लाटणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. अनिता विनोद मेश्राम यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांचे घर हडपणाऱ्या व खोटे विक्रीपत्र तयार करणाऱ्या तसेच योग्य चौकशी न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. भारतीय संविधानाच्या २१ ‘क’ व प्रस्तावनेत समता व समान संधी देण्याची हमी देणाऱ्या भारत सरकारच्या संविधानांतर्गत सर्वाना मोफत शिक्षण मिळावे आदी मागण्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग, सरचिटणीस योगेश ठाकरे, जुनेद अली, अल्का जनबंधू, कविता महाजन, इंदिरा तिडके, अनुपमा तेलंग, उषा मेश्राम आणि अरुण लोलेकर  उपस्थित होते, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.