शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यविधीचा चौथरा हलवू नये व शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असे नामकरण करावे या शिवसेनेच्या दोन्ही मागण्यांना आरपीआयचा पाठिंबा असल्याचे मत रामदास आठवले यांनी कर्जत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आरपीआयचे तालुकाध्यक्ष शरद भैलुमे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आठवले काल रात्री येथे आले होते. यावेळी माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अजय साळवे, निळकंठ ठोसर, प्रतापराव भैलुमे, संजय भैलुमे, रविंद्र दामोदरे, चंद्रकांत भैलुमे, पंडितराव भैलुमे, राम साळवे, रमेश गंगावणे, विजय चाबुकस्वार, सुनील कांबळे आदींसह आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.
भैलुमे यांच्या निधनामुळे कर्जतमध्ये आरपीआयचे मोठे नुकसान झाल्याने आठवले यांनी नमूद केले. ते म्हणाले की, शिवसेनेने शिवाजी पार्कचे नाव बदलण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. मनसेबरोबर कधीही युती करणार नाही. प्रसंगी महायुतीमधून बाहेर पडू, मात्र मनसेचा विचार नाही, असे सांगून इंदू मिलच्या जागेचा प्रश्न आम्ही सोडवला, मात्र आता काँग्रेस याचे खोटे श्रेय घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याला जादा महत्व न देता बाबासाहेबांचे स्मारक होणार हे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी दि. १९ रोजी नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल. या सरकारने हा प्रश्न मार्गी न लावल्यास २०१४ साली महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला पहिले आरक्षण देण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र, हे आरक्षण आर्थिक निकषांवर असेल, असे ते म्हणाले. विदर्भाचा विकास करावा, अशीही आमची प्रमुख मागणी असल्याचे आठवले म्हणाले.