महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राजकारणात उलथापालथ करणारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशातून एकाचवेळी ११ खासदार देणाऱ्या रिपाइंचा सध्या लोकसभेत एकही प्रतिनिधी नाही. रिपाइंच्या विविध गटांचा आता स्वाभिमानासाठी संघर्ष सुरू आहे.
सतत चार वेळा निवडून येणारे, २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून पराभूत झालेले रामदास आठवले भाजपच्या समर्थनाने राज्यसभेवर गेले आहेत. रिपाइंमधील नेत्यांच्या अहंकारामुळे पक्षाचे ५० पेक्षा अधिक गट-तट निर्माण झाले आहेत. त्यातील १८ विविध गट महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय आहेत. परंतु स्वाभिमानासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. एका-एका जागेसाठी त्यांना वाटाघाटी कराव्या लागत आहे. रामदास आठवले यांनी भाजप-सेनेसोबत युती केली असून आता या पक्षांमिळून तयार झालेल्या आघाडीला ‘महायुती’ असे नाव दिले आहे. असे असताना महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी फक्त एका जागेवर उमेदवारी मिळाली आहे. इकडे रा.सु. गवई गटाने २२ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्याहून लढण्याची घोषणा केली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी पूर्वी गोंदिया येथून लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आघाडीने पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत योग्य वाटा देण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी माघार घेतली आहे. अन्य गटाने अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रिंगणात उडी घेतली आहे.
१९७१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंची काँग्रेससोबत आघाडी झाली. ४ जागांपैकी २ जागा जिंकल्या. दादासाहेब गायकवाड आणि बी.सी. कांबळे विजयी होऊन संसदेत गेले. यानंतर आरपीआयमध्ये फुटीला सुरुवात झाली. १९८४ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. याचवेळी दलित पँथर निर्माण झाली. आक्रमक शैलीमुळे दलित पँथरने आंबेडकरी जनतेत वेगळे स्थान निर्माण केले. त्यातून नामदेव ढसाळ, रामदास आठवले यांच्यासारखे नेते निर्माण झाले. दलित मुक्ती सेनेमुळे जोगेंद्र कवाडे पुढे आले. या दोन्ही गटांनी आरपीआयच्या विविध गटांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न केले. १९८८ मध्ये विविध गट एकत्रित आले. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, रा.सु. गवई, उपेंद्र शेंडे, टी.एम. कांबळे यांच्यासह दहा मोठय़ा नेत्यांनी हात मिळवले. १९८९ मध्ये मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये एकीकरणाची घोषणा केली. सुसंवादासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. नाना शामकु ळे अध्यक्ष बनले. परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून यामध्ये पुन्हा फूट पडली. आंबेडकर, कवाडे, आठवले व गवई यांनी आपले वेगळे गट निर्माण केले.
१९९८ मध्ये पुन्हा एकत्रिकरणाचे प्रयत्न झाले. हे चार नेते पुन्हा एकत्रित आले व काँग्रेसच्या पाठिंब्याने पुन्हा निवडून आले. १९५७ नंतर आरपीआयला मोठे यश प्राप्त झाले. परंतु १३ महिन्यातच लोकसभा भंग झाली. यानंतर पुन्हा गटबाजी निर्माण होऊन नेत्यांनी वेगवेगळ्या वाटा धरल्या.
कुणी काँग्रेस व राष्ट्रवादी, तर कुणी भाजप व सेनेसोबत हातमिळवणी केली. आता अशी स्थिती आहे की, हे चारही नेते आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. सध्या महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक आरपीआयचे गट नोंदणीकृत असले तरी यातील १८ गटच सक्रिय असल्याचे दिसून येते.

दुहीचा शाप
१९५७ मध्ये आरपीआयची स्थापना झाली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरपीआयची संकल्पना ठेवली होती. १९५६ ला त्यांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ ला स्थानिक नेत्यांनी शेडय़ुल कास्ट फेडरेशन भंग करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत आरपीआयने २० जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. पहिल्याच प्रयत्नात ११ जागांवर निळा झेंडा फडकला. परंतु या यशानंतर आरपीआय अधिक दिवस तग धरू शकली नाही. १९६१ मध्ये पहिली फूट पडली. दादासाहेब गायकवाड व बॅरि. खोब्रागडे वेगळे झाले. बॅरि. खोब्रागडेंसोबत रा.सु. गवई, सदानंद फुलझेले, आवळे बाबू निघून गेले. १९७० मध्ये दुसरी फूट पडली. बॅरि. खोब्रागडे आणि रा.सु. गवई यांचे दोन गट वेगळे झाले.