पोलीस प्रशिक्षणात नव्याने जनसंपर्क विषयाचा अंतर्भाव करण्याची तीन वर्षांपूर्वी केलेली घोषणा खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील प्रत्यक्षात आणू शकलेले नाहीत. नव्या काळातील आव्हाने, समस्या व बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता नव्याने जनसंपर्क अभ्यासक्रमाची गरज पुरोगामी महाराष्ट्र शासनाला ओळखता आलेली नाही, असेच यातून स्पष्ट होते.  
सध्या जनसंपर्क हा महत्वाचा विषय असून यापुढे पोलीस प्रशिक्षणात या विषयाचा अंतर्भाव केला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १ मे २०११ रोजी नागपुरात केली होती. नागरिक हा मालक व अधिकारी हा सेवक असल्याचे तत्त्व घटनेने सांगितले आहे. लोकांना मन असते का, असा प्रश्न विविध शासकीय कार्यालयात डोकावल्यावर पडतो. या देशातील नागरिक सन्मानाची अपेक्षा करीत असेल तर त्यात गैर नाही. अनेक बाबी नम्रपणे सांगितल्या जाऊ शकतात. सर्वच पोलिसांनी प्रेमाने वागले पाहिजे. मात्र, गुन्हेगारांशी नाही, असे सांगताना त्या दिवशी आबांचे मन भरून आले होते.
राज्यात १४ पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर शिपायांना प्रशिक्षण दिले जाते. त्यात गेल्या ३०-४० वर्षांपासून ‘पोलीस-जनता संबंध’ हा विषय शिकविला जातो. त्याच्या जोडीला ‘पोलीस आणि माध्यमे तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांशी वर्तन’ हे उपविषय अलीकडे शिकविले जाऊ लागले आहेत. एवढा अपवाद वगळला तर या अभ्यासक्रमात बदल केला गेलेला नाही. कार्पोरेट युग, तसेच जागतिकीकरण, नव्या काळातील आव्हाने, समस्या व बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता पोलिसांच्या प्रशिक्षणातही बदल करणे अत्यावश्यक आहे. याचा विचार करूनच नव्या जनसंपर्क विषयाचा अंतर्भाव करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर अथवा पोलिसांशी संपर्क आल्यानंतर घेतलेल्या अनुभवाअंती पोलिसांना जनसंपर्क विषय शिकविण्याची गरज असल्याचे कुठलाही नागरिक सांगेल. मोजक्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचा अपवाद वगळल्यास बहुतांशी पोलिसांचे वर्तन पाहता पोलिसांना खरोखरच हा विषय नव्याने शिकविण्याची गरज असल्याची वास्तव परिस्थिती आज पुरोगामीस अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात आहे. तीन वर्षांपूर्वी हीच बाब प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी बोलूनही दाखविली होती आणि ही परिस्थिती मान्य करूनच खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलीस प्रशिक्षणात नव्याने जनसंपर्क विषयाचा अंतर्भाव करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा ते प्रत्यक्षात आणू शकलेले नाहीत.

पोलीस दलात जनसंपर्क विषय शिकविला जातो. काळानुरूप परिस्थितीचा विचार करता ‘पोलीस आणि माध्यमे तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांशी वर्तन’ आदी विषयांच्या रूपाने त्यात भर पडली आहे. अनुभवी व ज्येष्ठ पोलीस अधिकारी हा विषय शिकवितांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामावर आलेले अनुभव व उद्भवलेली परिस्थिती कशी हाताळली, हे सांगतात. अतिथी व्याख्याने आयोजित केली जातात.
– रामचंद्र काटोले, आर. बी. तायवाडे
उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर</strong>