व्यापारी ओमप्रकाश डागा यांच्या २६ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणात गेले आठ दिवस पोलीस कोठडीत असलेल्या मुनीम जनार्दन घाटूळ व कारचालक साहेब जोंधळे या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
पोलीस कोठडीत आरोपींकडून रोकड चोरीबाबत ठोस माहिती न मिळाल्यामुळे गुन्ह्याची उकल अजून होऊ शकली नाही. दरम्यान, दोन्ही आरोपींची नार्को चाचणी करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली. गेल्या १८ मे रोजी हैदराबाद बँकेसमोरून २६ लाख ४७ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीस गेल्याप्रकरणी डागा यांचे मुनीम घाटूळ यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी संशयावरून फिर्यादी घाटूळ व कारचालक जोंधळे या दोघांना अटक केली. प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी रोकड चोरीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना न्यायालयाकडून सुरुवातीला पाच दिवस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना दोन्ही आरोपी विसंगत माहिती देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. म्हणून पुन्हा न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान, दोन्ही आरोपींची नार्को चाचणी करण्याबाबत पोलिसांनी पावले टाकली आहेत. न्यायालयाकडे तशी परवानगी मागितली.