राम मंदिर बांधण्याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य म्हणजे पावसळ्यातील बेडकांची डराव डराव असल्यासारखे आहे असे म्हणत रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर आणि संघावर कडाडून टीका केली. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कैकेयीची भूमिका बजावत आहेत असेही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. रामाला चौदा वर्षांचा वनवास झाला मात्र भाजपा आणि संघाने प्रत्येक निवडणुकीत रामाला वनवासात पाठवलं अशीही टीका सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक निवडणुकांच्या वेळी राम मंदिर बांधण्याची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात मंदिर आहे कुठे? संघ आणि भाजपाने रामाला ३० वर्षांपेक्षा जास्त काळ वनवासात पाठवले अशा शब्दात सुरजेवाला यांनी टीका केली. राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रविष्ट आहे. या प्रकरणी आता जो निकाल येईल त्यावर सरकारने अंमलबजावणी करावी अशीही मागणी काँग्रेसने केली आहे.
राम मंदिर उभारणीला विरोधी पक्षांचा जाहीर विरोध नाही असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं होतं ज्याला काँग्रेसने सडेतोड उत्तर देत मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे बेडकाची डराव डराव असल्याचे म्हटले आहे. भाजपा नेते आता या सगळ्याला काय उत्तर देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 2:20 pm