दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात आणि त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्यात भारतीय जनता पक्षाकडून समाधानकारक काम होत नसल्याचे लक्षात येताच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.
वादळी पावसामुळे झालेली पिकांची नासाडी, त्यानंतर पडलेला दुष्काळ, कर्जबाजारी अशा सगळ्या परिस्थितीतमध्ये गेल्या दोन तीन वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे. निवडणुकीपूर्वी केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले जातील आणि आत्महत्याचे प्रमाण कमी होईल, असे वाटत होते. मात्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत वावरत आहे. दोन महिने आधी विदर्भ, मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागात पडलेला दुष्काळ बघता राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी पॅकेज घोषित केले. केंद्र सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील विविध दुष्काळग्रस्त भागात सर्वेक्षण केले. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी केवळ आस लावून बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण मुले शेती विकून कुठला तरी रोजगार करण्याच्या मनस्थितीत आहे, अशा परिस्थितीमध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला असून विविध जिल्ह्य़ात जाऊन शेतकऱ्यांचे समुपदेश करणार आहे. संघाच्या माध्यमातून यापूर्वी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी काम केले जात होते आणि सध्या करीत आहे. भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच या संस्था शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असले तरी येणाऱ्या काळात त्या त्या भागातील स्वयंसेवक आपापल्या भागात जाऊन शेतकऱ्यांचे समुपदेशन करणार आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्याभारती, भाऊराव देवरस प्रतिष्ठान आदी संस्थांतर्फे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी अभ्यास वर्ग आयोजित करून त्यांना राज्याच्या विकासासाठी काय काय योजना राबविल्या गेल्या पाहिजेत, पक्षाची ध्येय धोरण लक्षात घेऊन समाजात काम कसे केले पाहिजे, अशा विविध विषयावर बौद्धिक दिले जात आहे. ग्रामीण भागात संघाचे स्वयंसेवक असून त्यांचे बौद्धिक वर्ग आयोजित केले जात आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंना शिक्षित करावे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करावी यादृष्टीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून छोटय़ा गावांमध्ये एकल विद्यालयामधून शिक्षण दिले जात असताना शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि शेतीविषयक माहिती देण्यासाठी येणाऱ्या काळात स्वयंसेवक  काम करणार आहे. यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले, संघ विविध क्षेत्रात काम करीत असल्यामुळे नवीन काही करणार नाही. मात्र, आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सकारात्मकदृष्टय़ा काय करता येईल. त्यादृष्टीने स्वयंसेवक काम करणार आहे.