कल्याणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शासनाने वाडेघर येथे अडिच एकर जागा मंजूर , केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची प्रक्रिया लवकर पूर्ण केली तर या प्रशस्त जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लवकर सुरू करता येईल असे कल्याणमधील आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनविषयक अनेक कामांसाठी दररोज शेकडो नागरिक कल्याणमधील आरटीओ कार्यालयात येतात. या कार्यालयात पुरेशा सुविधा नसल्यामुळे नागरिकांना सुविधा देताना येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक गुजराथी यांनी सांगितले. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सुमारे पाच लाख विविध प्रकारच्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. वाहन परवाना नुतनीकरण, नवीन परवाना, भंगारातील वाहने, नवीन वाहन क्रमांक यासारख्या अनेक कामांसाठी नागरिक आरटीओ कार्यालयात येतात. या सेवा देताना जागेमुळे अनेक अडचणी येतात.
वाडेघर येथील एका भूखंडावर स्मशानभुमीचे आरक्षण होते. ते उठवून तेथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागा देण्याची मागणी पुढे आली होती. यासंबंधी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने आरटीओसाठी त्या ठिकाणी जागा देण्याचे मान्य केले. कल्याण डोंबिवली महापालिकेने या जागेसाठी अनुकुलता दर्शवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची प्रक्रिया लवकर पूर्ण केली तर या ठिकाणी कामाचा शुभारंभ करून तेथे कार्यालय सुरू करणे शक्य होईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.