गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मीटर न लावणाऱ्या ऑटोरिक्षांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनेक ऑटो जप्त करण्यात आल्याने गिरीपेठेतील आरटीओ कार्यालय परिसरात ऑटो जप्त केले आहेत. त्यामुळे ऑटोने संपूर्ण परिसर व्यापला गेला आहे. आपण शिकाऊ परवाना किंवा इतर काही आरटोओशी संबंधित कामे करण्यास तेथे गेल्यास क्षणभर असा भास होतो की, आपण भंगार सामान खरेदी करण्यास तर आलो नाही ना असे वाटते.
राज्यातील सर्व ऑटोत शासनाच्या परिवहन विभागाने इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटर बसवावे, असा सक्तीचा नियम  लावण्यात आला आहे. त्यासाठी शेवटची तारीख ३० जून देण्यात आली होती. त्याला मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसून अजूनही १० हजार ऑटो इलेक्ट्रॉनिक मीटरविना धावत आहेत. ऑटो चालकांनी मध्यंतरी आरटीओच्या या कारवाईने धसका घेऊन मीटर लावणे सुरू केले होते. अजूनही ४ हजार ऑटो इलेक्ट्रॉनिक मीटर न लावता सुरू आहेत. ६३५ ऑटो आरटीओ ने जप्त केले असून त्यापैकी काही ऑटो भंगारात काढून काही ऑटोची लिलावाच्या द्वारे विक्री केली आहे. जागेअभावी काही ऑटो पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. जप्तीचे ऑटो आरटीओ परिसरात ठेवण्यात आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली वाहने ठेवण्यात अडचण होत आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाच्या मागील भागातही जप्त केलेल्या वाहनांनी परिसर व्यापला असल्याने परवाना घेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी, वाहनांचा टॅक्स भरण्यासाठी, तसेच वाहनांचे पासिंग करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी यासारख्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने त्यांना कुठे ठेवावी, असा प्रश्न पडत आहे. पूर्व नागपूर आरटीओचे काम देखील येथेच होत असल्याने गर्दी वाढत आहे. या सर्वामुळे अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत.
जे १६ वर्षांपेक्षा जुने असलेल्या ऑटोंचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अशा ऑटोंची तपासणी क रण्यासाठी विशिष्ट पथके तयार करण्याचे आदेशही शासनाने राज्यातील आरटीओंना दिले आहेत. त्याचप्रमाणे ही तपासणी १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि त्यातून काही ऑटो जप्त होणार आहे. १६ वर्षांपेक्षा जुने असलेले ऑटो ३ हजारच्या आसपास आहेत, अशी माहिती आरटीओकडून समजली. त्यामुळे १ ऑगस्टपासून तपासणी सुरू झाल्यास रस्त्याच्या कडेला ऑटोची रांग दिसू लागेल.