मुस्लिम महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणा-या येथील सामाजिक कार्यकर्त्यां रुबीना पटेल यांना केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा २०१४ चा बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत १८ ऑक्टोबरला होणा-या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार पटेल यांना दिला जाणार आहे.
५० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. शेखर सोनाळकर हे प्रमुख पाहुणे तर अन्वर राजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.  
व्यकितगत जीवनात प्रचंड संघर्षांला तोंड दिल्यानंतर रुबीना पटेल या रुबी सोशल वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून पीडित स्त्रियांचे पुनर्वसन व त्यांना कायदेविषयक आणि इतर सहाय्य करणे याकरिता कार्यरत आहेत. मुस्लिम वुमन राईट नेटवर्कच्या माध्यमातून मुस्लिम महिलांसाठी त्या राष्ट्रीय स्तरावर देखील कार्यरत आहेत.
जनहित याचिका, माहितीचा अधिकार, संविधानातील तरतुदी यांचा वापर करुन लढे देणा-या व पर्याय उभारणा-या व्यक्तीला प.बा. उर्फ बाबुराव सामंत यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार देण्यात येतो.