विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केलेला पाच लाख कोटींचा भ्रष्टाचार, महागाईने मोडलेला उच्चांक अशा अनेकविध कारणांमुळे जनतेमधील विश्वासार्हता काँग्रेस पक्ष गमावून बसला आहे, परंतु या संधीचा फायदा करून घेण्यासाठी विरोधी पक्षही सक्षम नाही. विरोधी पक्ष म्हणून भाजप परिणामकारक भूमिका बजावू शकलेला नाही.    
वाढलेल्या    अंतर्गत    कलहामुळे भाजपनेदेखील विश्वासार्हता गमावली आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरची राजकीय परिस्थिती’ या विषयावर चावके बोलत होते. आपल्या व्याख्यानात चावके यांनी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांच्या सशक्त व दुर्बल बाजू मांडल्या.
विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला या नऊ वर्षांत मित्रपक्ष जोडता   आले    नाही,    याकडे    त्यांनी लक्ष वेधले. याबरोबरच    प्रबळ    विरोधी  पक्ष म्हणून त्यांना परिणामकारकरीत्या   जबाबदारी पार पाडता आली नाही. हे भाजपचे अपयश म्हणावे लागेल.
जेवढी विश्वासाहर्ता ‘आयपीएल’ने जनतेमध्ये निर्माण केली तेवढीच विश्वासार्हता काँग्रेसने मिळवली आहे. २००९ मध्ये २०६ जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्यांदा सत्तेवर आली, परंतु   सत्तेच्या चार वर्षांत केंद्र सरकारने वाढत्या    महागाई    व     भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामुळे    जनतेचा    रोष     ओढावून घेतला.
परिणामी चहुबाजूंनी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. सत्ताधारी मतपरिवर्तनाच्या आशेवर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. निष्क्रिय विरोधी पक्ष म्हणून भाजपनेही लौकिक प्राप्त केला असल्याचा टोला चावके यांनी हाणला.
आगामी    लोकसभा    निवडणुकीत    सत्ताधाऱ्यांनी आपल्या पारंपरिक जागा गमाविल्या तरी भाजपला  सदर    जागांचा    फायदा  होईल असे  चित्र सध्या दिसत नाही,    असेही    त्यांनी  नमूद केले.