महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविल्यानंतर पक्षातीलच नगरसेवकांमधील हाणामारीच्या घटनांमुळे धुळेकरांमधील प्रतिमा डागाळलेल्या राष्ट्रवादीने आता त्यात सुधार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत दर्जेदार कामांसाठी आराखडा तयार केला जात आहे. भुयारी मार्ग किंवा स्कायवॉक याद्वारे मुख्य बाजारपेठ किंवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
‘सुंदर स्वच्छ शहर’ तसेच भ्रष्टाचार व गुंडगिरीमुक्त शहर ठेवण्याची ग्वाही देत निवडणूक रिंगणात प्रचार करणाऱ्या आ. अनिल गोटे यांच्या उमेदवारांना धूळ चारत धुळेकरांनी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास टाकला, परंतु मतमोजणीच्या दिवसापासून राष्ट्रवादीतच सुरू झालेल्या हाणामाऱ्या पाहून धुळेकर अस्वस्थ झाले होते. राष्ट्रवादीला मतदान करून शहरातील कायदा व व्यवस्थेला बाधा तर येणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटावयास लागली. धुळेकरांच्या मनातील ही अस्वस्थता ओळखून कदमबांडे यांनी महापालिकेच्या माध्यमातून कोणती कामे करता येणे शक्य आहे ते तपासण्यास सुरुवात केली.
मुख्य बाजारपेठेसह सर्व वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीस सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. शहरातील शैक्षणिक परिसर असलेल्या कमलाबाई कन्या शाळा, बाफना शाळा, जिजामाता हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे येथील चौकात गोंधळ उडतो. शाळा किंवा महाविद्यालयांची सुटी होण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेत काही मिनिटांचा फरक ठेवला जात असला तरी याच भागात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, उपनिबंधक, प्रांताधिकारी, कोषागार अशी   निरनिराळी  कार्यालये, बँका आहेत. मोठे व्यापारी संकुलही याच भागात असल्याने साहजिकच वाहतूक पोलिसांवर ताण पडतो.
या पाश्र्वभूमीवर वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कमलाबाई कन्या शाळा ते बाफना हायस्कूल या दरम्यान भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. चाळीसगाव रोड रेल्वे क्रॉसिंग ते मिल परिसर या भागाला जोडण्यासठी शहरांतर्गत  उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसंग्रामने केलेल्या चौपाटी, शिवतीर्थ, गुरू-शिष्य स्मारक किवा अन्य कामांपेक्षा सरस काम करण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान आहे.